वसतिगृह प्रवेशासाठी ऑफलाईन अर्जाची संधी
तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन अर्ज न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा स्थानिक वसतिगृहात अर्ज करण्याचे आवाहन लातूर, १० ऑगस्ट (हिं.स.) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणींमु
शासकीय वस्तीग्रह


तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन अर्ज न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा

स्थानिक वसतिगृहात अर्ज करण्याचे आवाहन

लातूर, १० ऑगस्ट (हिं.स.) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या स्थानिक वसतिगृहाचे गृहप्रमुख किंवा गृहपाल यांच्याशी संपर्क साधून ऑफलाईन अर्ज भरावा, असे आवाहन सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.

लातूर जिल्ह्यात मुलांसाठी १४ आणि मुलींसाठी १२ अशी एकूण २६ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. यापैकी लातूर शहरात मुलांचे ६ आणि मुलींचे ४ वसतिगृह आहेत. औसा, निलंगा, उदगीर, देवणी आणि चाकूर येथे प्रत्येकी मुलांचे एक व मुलींचे एक वसतिगृह आहे. अहमदपूर येथे मुलांचे दोन व मुलींचे दोन, तर रेणापूर येथे मुलांचे एक आणि जळकोट येथे मुलींचे एक वसतिगृह कार्यरत आहे.

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी कनिष्ठ महाविद्यालय तसेच बिगर व्यावसायिक वरिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशाची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे.

मागील वर्षी अंतिम वर्षात शिक्षण घेणारे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज केलेले काही विद्यार्थी तांत्रिक कारणांमुळे चालू शैक्षणिक वर्षात वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करू शकले नाहीत. तसेच महाविद्यालयीन प्रवेशास विलंब झाल्याने किंवा अन्य तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन अर्ज न भरू शकलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज आता ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत.

दरम्यान, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना जागेअभावी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू न शकल्यास त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. मात्र, वसतिगृह प्रवेशासाठी अर्जच न केलेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेसाठी स्वतंत्रपणे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही, असेही सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande