रायगडच्या ५ शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी
रायगड, 10 ऑगस्ट (हिं.स.)। आधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादनवाढीच्या पद्धती आणि विविध देशांतील शेतीतील प्रयोगांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी परदेश अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिण
रायगडच्या ५ शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी


रायगड, 10 ऑगस्ट (हिं.स.)। आधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादनवाढीच्या पद्धती आणि विविध देशांतील शेतीतील प्रयोगांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी परदेश अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव २५ ऑगस्ट २०२६ पूर्वी सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे.

विविध देशांनी विकसित केलेले कृषी तंत्रज्ञान, तेथील शेतकऱ्यांकडून त्याचा होणारा वापर आणि त्यातून वाढलेले उत्पन्न याचा अभ्यास या दौऱ्यात करण्यात येणार आहे. तसेच परदेशातील शास्त्रज्ञ, प्रगतिशील शेतकरी, कृषी संस्था आणि संबंधित संस्थांना भेटी देऊन शेतकऱ्यांचे ज्ञान व क्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

जिल्ह्यातून एकूण पाच शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये एक महिला शेतकरी, राज्य अथवा केंद्रस्तरीय कृषी पुरस्कार प्राप्त किंवा पीकस्पर्धा विजेते शेतकरी आणि इतर तीन शेतकऱ्यांचा समावेश असेल. अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करणारा शेतकरी स्वतः शेती करणारा असणे आवश्यक असून अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी बंधनकारक आहे. शेती हे उत्पन्नाचे मुख्य साधन असल्याचे स्वयंघोषणापत्रात नमूद करावे लागेल. एका शेतकरी कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराचे वय दौऱ्याच्या दिवशी किमान २५ वर्षे असावे.

अर्जदाराकडे किमान एक वर्ष वैधता असलेला पासपोर्ट असणे आवश्यक आहे. तसेच आधारकार्ड, शिधापत्रिकेची प्रत आणि एम.बी.बी.एस. डॉक्टरांचे वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अर्जदार शासकीय, निमशासकीय, सहकारी किंवा खासगी संस्थेत नोकरी करणारा तसेच डॉक्टर, वकील, सीए, अभियंता किंवा कंत्राटदार नसावा. यापूर्वी शासनाच्या अर्थसहाय्याने परदेश दौरा केलेला नसावा.

शासनाकडून अभ्यास दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा कमाल दोन लाख रुपये, यापैकी कमी असलेली रक्कम अनुदान म्हणून दिली जाणार आहे. शेतकरी निवडीचा अंतिम अधिकार राज्यस्तरीय समितीकडे राहणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी विहित कागदपत्रांसह प्रस्ताव २५ ऑगस्ट २०२६ पूर्वी सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कृषी विभागाने कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande