
धाराशिव, 10 ऑगस्ट (हिं.स.)।
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीय मुला-मुलींच्या शिक्षणाला आधार देण्यासाठी शासकीय वसतिगृहांची योजना राबविण्यात येते.शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तींनुसार या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.जिल्ह्यात सध्या एकूण ११ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत.सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून,१५ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
गुणवत्तेनुसार प्रवेश
शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही,अशा विद्यार्थ्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना उपलब्ध आहे.मात्र, स्वाधार योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे.
१५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
शासकीय वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शासकीय वसतिगृह प्रवेशाचे ऑनलाइन पोर्टल येथे विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावा,असे आवाहन सचिन कवले,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,धाराशिव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis