एसआयआर संगणकीकरणात परभणी जिल्ह्याचे काम 100 टक्के पूर्ण
परभणी, 10 ऑगस्ट (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमात परभणी जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेतील संगणकीकरणाचे काम 100 टक्के पूर्ण कर
एसआयआर संगणकीकरणात परभणी जिल्ह्याचे काम 100 टक्के पूर्ण


परभणी, 10 ऑगस्ट (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमात परभणी जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेतील संगणकीकरणाचे काम 100 टक्के पूर्ण करत परभणी जिल्ह्याने मराठवाडा विभागात प्रथम, तर राज्यात एकूण कामगिरीत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

विशेष म्हणजे, परभणी जिल्ह्यात महानगरपालिका क्षेत्राचा समावेश असतानाही नागरी भागाचा विचार करता परभणी जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. राज्यातील एकूण क्रमवारीत रत्नागिरी जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला असून, रत्नागिरी हा प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाचा जिल्हा आहे. पावसाळ्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही अधिकारी, कर्मचारी आणि बीएलओ यांच्या अथक परिश्रमातून परभणीने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. या यशामागे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे प्रभावी नियोजन, सातत्यपूर्ण पर्यवेक्षण, नियमित आढावा आणि मार्गदर्शन निर्णायक ठरले. जिल्ह्यातील एसआयआर प्रक्रियेला अपेक्षित गती मिळावी आणि निर्धारित उद्दिष्ट वेळेत साध्य व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी दररोज सायंकाळी ७ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांचा वैयक्तिकरीत्या आढावा घेतला.

या आढाव्यादरम्यान विधानसभा मतदारसंघनिहाय प्रगती, प्रलंबित कामकाज, तांत्रिक अडचणी तसेच अपेक्षित कार्यवाही यांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधितांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. या सातत्यपूर्ण आणि परिणामाभिमुख पर्यवेक्षणाला सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांशी प्रभावी समन्वय साधला आणि कामाला अपेक्षित गती दिली. जिल्हास्तरावरून करण्यात आलेल्या या नियमित व वैयक्तिक पर्यवेक्षणामुळे क्षेत्रीय यंत्रणेतील समन्वय अधिक बळकट झाला. प्रलंबित कामांचे सातत्याने परीक्षण, अडचणींचे तातडीने निराकरण आणि क्षेत्रीय यंत्रणेला वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन यामुळे एसआयआर प्रक्रियेतील संगणकीकरणाचे काम निर्धारित उद्दिष्टानुसार 100 टक्के पूर्ण करण्यास निर्णायक मदत झाली.

तांत्रिक मार्गदर्शनातून प्रक्रियेला बळ

उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रक्रियेच्या बारकाव्यांबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन केले. एसआयआर प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक बाबींचे निराकरण, क्षेत्रीय यंत्रणेशी सातत्यपूर्ण समन्वय आणि कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात त्यांच्या मार्गदर्शनाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.

विधानसभा मतदारसंघनिहाय सूक्ष्म नियोजन

क्षेत्रीय स्तरावर उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी उदयसिंह भोसले (परभणी), शैलेश लाहोटी (सेलू), संगीता चव्हाण (पाथरी) आणि जीवराज डापकर (गंगाखेड) यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सूक्ष्म नियोजन, नियमित आढावा आणि प्रभावी समन्वयाच्या माध्यमातून एसआयआर कामाला गती दिली. विधानसभा मतदारसंघनिहाय प्रलंबित बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे अंतिम टप्प्यातील कामकाजात सातत्य आणि गतिमानता कायम राहिली.

पावसातही थांबले नाही पाऊल...

एसआयआर प्रक्रियेच्या या यशात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती बीएलओ आणि क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्यांनी. पावसाळ्याचे दिवस, ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थिती, वाहतुकीच्या अडचणी आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्यातील आव्हाने असतानाही बीएलओ यांनी घरोघरी भेटी देत, नागरिकांशी संवाद साधत आणि आवश्यक माहिती संकलित करत आपली जबाबदारी अत्यंत कर्तव्यनिष्ठेने पार पाडली.

मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच इतर विभागांतील क्षेत्रीय कर्मचारी यांनीही या मोहिमेत मोलाची साथ दिली. “निवडणूक ही केवळ निवडणूक विभागाची जबाबदारी नसून ती लोकशाहीची सामूहिक जबाबदारी आहे,” या भावनेतून विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांनी एसआयआर मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला.तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच तहसील कार्यालयातील निवडणूक विषयक कामकाजाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही नियमित प्रशासकीय कामकाजासोबत SIR प्रक्रियेला प्राधान्य दिले. वेळेची तमा न बाळगता, सुट्ट्या तसेच नियमित कार्यालयीन वेळेच्या पलीकडेही काम करत या मोहिमेला अपेक्षित गती देण्यात आली.

सामूहिक प्रयत्नांना यशाची मोहोर

परभणी जिल्ह्याची ही कामगिरी कोणत्याही एका अधिकारी किंवा विभागाची नसून जिल्हा प्रशासन, निवडणूक यंत्रणा, महसूल यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी, विविध विभागांचे क्षेत्रीय कर्मचारी आणि हजारो बीएलओ यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.

विशेष सखोल पुनरिक्षणाच्या माध्यमातून मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने परभणी जिल्ह्याने केलेली ही कामगिरी निश्चितच उल्लेखनीय आहे. मराठवाड्यात प्रथम, राज्यात द्वितीय आणि नागरी भागाच्या कामगिरीत राज्यात प्रथम स्थान मिळवत परभणी जिल्ह्याने पुन्हा एकदा नियोजन, सातत्यपूर्ण पर्यवेक्षण, प्रभावी समन्वय आणि टीमवर्कच्या बळावर उल्लेखनीय कामगिरी करण्याची आपली क्षमता सिद्ध केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande