बीड-परळी नगर परिषदेत नागरिकांना मिळणार डिजिटल सेवांचा लाभ
बीड, 10 ऑगस्ट (हिं.स.)परळी वैजनाथ नगर परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत परळी नगर परिषदेचा WhatsApp Chatbot सुरू करण्याबाबत सर्वानुमते ठराव घेण्यात आ
बीड-परळी नगर परिषदेत नागरिकांना मिळणार डिजिटल सेवांचा लाभ


बीड, 10 ऑगस्ट (हिं.स.)परळी वैजनाथ नगर परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत परळी नगर परिषदेचा WhatsApp Chatbot सुरू करण्याबाबत सर्वानुमते ठराव घेण्यात आला.

नागरिकांना नगर परिषदेच्या विविध सेवा आणि योजनांची माहिती सहज, जलद आणि घरबसल्या उपलब्ध व्हावी, तसेच प्रशासनाशी नागरिकांचा संवाद अधिक सुलभ व्हावा, या उद्देशाने हा डिजिटल उपक्रम राबविण्यात येणार आहे.

WhatsApp Chatbot च्या माध्यमातून नागरिकांना नगर परिषद सेवांची माहिती, विविध अर्ज व प्रमाणपत्रांच्या प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची माहिती, कर व इतर नागरी सेवांबाबत मार्गदर्शन, तक्रार नोंदणी, तक्रारीची सद्यस्थिती, महत्त्वाच्या सूचना व संपर्काची माहिती एकाच डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून, केवळ माहिती घेण्यासाठी किंवा प्राथमिक स्वरूपाच्या कामासाठी नगर परिषद कार्यालयात वारंवार येण्याची गरज कमी होणार आहे. ‘डिजिटल नगर परिषद आणि नागरिकाभिमुख प्रशासन’ या संकल्पनेच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

दरम्यान, नगर परिषद प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षेच्या दृष्टीने अभ्यागतांच्या आवक-जावक नोंदीसाठी स्वतंत्र रजिस्टर, नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र रजिस्टर, प्रवेश नियंत्रण व्यवस्था, अभ्यागत पास प्रणाली तसेच CCTV यंत्रणा अधिक सक्षम करण्याबाबत देखील सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी शहरातील विविध प्रश्न व विकासाच्या विषयांवर साधक-बाधक चर्चा करून नागरिकांच्या हिताला प्राधान्य देणारे अनेक सकारात्मक निर्णय घेतले.

परळी नगर परिषद — आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, सुरक्षित प्रशासन आणि नागरिकांच्या सुविधांना सर्वोच्च प्राधान्य!

— सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी

नगराध्यक्षा, परळी वैजनाथ नगर परिषद

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande