धाराशिवमध्ये १२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवडीचे लक्ष्य
‘हरित धाराशिव अभियान २.०’मधून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न मियावाकी पद्धतीने आठ ठिकाणी घनवन निर्मिती करणार छत्रपती संभाजीनगर, १० ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रीय वन धोरणानुसार पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के भागावर वन अस
धाराशिवमध्ये १२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवडीचे लक्ष्य


‘हरित धाराशिव अभियान २.०’मधून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न मियावाकी पद्धतीने आठ ठिकाणी घनवन निर्मिती करणार

छत्रपती संभाजीनगर, १० ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रीय वन धोरणानुसार पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के भागावर वन असणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रात सध्या सुमारे २० टक्के क्षेत्र वनाखाली असताना धाराशिव जिल्ह्यात हे प्रमाण अवघे एक टक्का आहे. जिल्ह्याचे वनक्षेत्र वाढविण्यासाठी वनेतर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून ‘हरित धाराशिव अभियान २.०’ राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत १४ ऑगस्ट रोजी एकाच वेळी आठ ठिकाणी, सलग १२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षांची मियावाकी पद्धतीने लागवड करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने लागवड, मोजणी, पुरावे संकलन आणि संवर्धनाची स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे.

अभियानांतर्गत जिल्ह्यातील आठ ठिकाणी एकूण ३३.७ हेक्टर क्षेत्रावर स्थानिक व देशी प्रजातींच्या रोपांची घनवन निर्मिती केली जाणार आहे. मियावाकी पद्धतीसाठी निवडलेल्या प्रजाती स्थानिक पर्यावरणास अनुकूल आहेत की नाही, याची वनतज्ज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ आणि पर्यावरणतज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे. जमीन, माती, सूर्यप्रकाश, पाण्याची उपलब्धता आणि भूप्रदेश यांचाही अभ्यास करण्यात येणार आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या निकषांनुसार विक्रमासाठी सहभागींच्या संख्येपेक्षा प्रत्यक्ष लावण्यात आलेल्या vascular plantsची संख्या महत्त्वाची ठरणार आहे. प्रत्येक रोपाची स्वतंत्र नोंद ठेवली जाणार असून, कोणतेही रोप दोनदा मोजले जाणार नाही यासाठी विशेष नियंत्रण व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर Plantation Log, Participant Register आणि Detailed Log Book ठेवण्यात येणार आहेत.

सर्व आठ केंद्रांचे कामकाज Centralised Monitoring System आणि Control Roomच्या माध्यमातून नियंत्रित केले जाईल. लागवडीदरम्यान फोटो, व्हिडिओ, ड्रोन फुटेज, GPS माहिती, वेळेच्या नोंदी आणि साक्षीदारांचे जबाब संकलित करून प्रत्येक केंद्रासाठी स्वतंत्र Evidence Package तयार केले जाणार आहे. त्यानंतर सर्व माहितीचा एकत्रित अहवाल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडे सादर केला जाणार आहे.

विक्रमाच्या प्रयत्नापूर्वी सर्व केंद्रांवर मॉक ड्रील घेऊन मोजणी, वेळेचे नियोजन, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि पुरावे संकलन यांची चाचणी केली जाणार आहे. तसेच लागवडीनंतर रोपांच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी सिंचन, संरक्षण, पुनर्लागवड आणि देखभालीचे नियोजन करण्यात येणार आहे.

‘हरित धाराशिव अभियान २.०’ हा उपक्रम केवळ जागतिक विक्रमापुरता मर्यादित न राहता जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढविणारी आणि पर्यावरण संवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देणारी व्यापक मोहीम ठरण्याची अपेक्षा आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande