अंबाजोगाईत भाड्याच्या फ्लॅटवर चालणाऱ्या कुंटनखान्यावर पोलिसांचा छापा
बीड, 10 ऑगस्ट (हिं.स.)। सेलू रोड परिसरातील एका अपार्टमेन्टमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर कुंटनखान्यावर पोलिसांनी छापा मारून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली, तर त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घ
पोलिसांची धाड


बीड, 10 ऑगस्ट (हिं.स.)।

सेलू रोड परिसरातील एका अपार्टमेन्टमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर कुंटनखान्यावर पोलिसांनी छापा मारून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली, तर त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या आंटीला ताब्यात घेऊन तिच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.

परभणी जिल्ह्यातील डेबेवाडी येथील रहिवासी आणि सध्या अंबाजोगाईत राहणारी शिवकन्या नवनाथ फड ही आंटी बाहेरच्या शहरातून महिला आणून त्यांचाकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून अंबाजोगाई शहर पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा होताच पोलिसांनी सेलू रोडवरील पिताजी सारडा नगरीतील अपार्टमेन्टमधील फ्लॅट नंबर D4 मधील कुंटनखान्यावर छापा मारण्यासाठी तात्काळ कारवाईचे नियोजन केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने पंचांना बोलावून पोलीस पथकाने बनावट ग्राहक तयार केला. डमी ग्राहकाकडे पाचशे रुपयांच्या दोन नोटा देऊन त्याला संबंधित फ्लॅटवर पाठवण्यात आले. साध्या वेशातील पोलिसांनी अपार्टमेन्टच्या सर्व बाजूंनी घेराबंदी केली.

डमी ग्राहकाने फ्लॅटमध्ये प्रवेश करून व्यवहार निश्चित केला आणि खिडकीतून बाहेर तैनात असलेल्या पोलिसांना ठरल्याप्रमाणे इशारा केला. इशारा मिळताच पोलीस पथकाने तात्काळ फ्लॅटचा दरवाजा वाजवून आत प्रवेश केला. पाहणीदरम्यान एका खोलीत पीडित महिला आणि डमी ग्राहक आढळून आले, तर दुसऱ्या खोलीत वेश्या व्यवसाय चालवणारी महिला चालक उपस्थित होती. पोलिसांनी घटनास्थळावरून डमी ग्राहकाला दिलेल्या नोटा आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आनंद शंकर शिंदे यांनी सरकारतर्फे तक्रार दिली आहे. त्यानुसार शिवकन्या फड (वय ४०) हिच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande