यवतमाळ-पोल कोसळून पिकांचे नुकसान; देखभाल-दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह
यवतमाळ , 10 ऑगस्ट (हिं.स.)पावसाळा सुरू होताच शेतीपंपासाठी उभारलेल्या जुनाट वीजवाहिन्यांची दुरवस्था शेतकर्!यांच्या मुळावर उठली आहे. कोळंबी उपविभागांतर्गत पार्डी, भांबोरा, अंजी, कारेगाव, तळणी, कोळी परिसरात अनेक ठिकाणी वीजचे पोल जीर्ण झाले असून, पावसा
शेतीपंपांच्या वीजवाहिन्या बनल्या धोकादायक


यवतमाळ , 10 ऑगस्ट (हिं.स.)पावसाळा सुरू होताच शेतीपंपासाठी उभारलेल्या जुनाट वीजवाहिन्यांची दुरवस्था शेतकर्!यांच्या मुळावर उठली आहे. कोळंबी उपविभागांतर्गत पार्डी, भांबोरा, अंजी, कारेगाव, तळणी, कोळी परिसरात अनेक ठिकाणी वीजचे पोल जीर्ण झाले असून, पावसाच्या तडाख्यात ते शेतात कोसळत आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्यासोबतच उभ्या पिकांचे नुकसान होत असून, जीवितहानीचा धोकाही निर्माण झाला आहे.

शेतीपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी या गावांमध्ये अनेक वर्षांपूर्वी वीजवाहिन्या उभारण्यात आल्या. कालांतराने पोल कमकुवत झाले. मात्र, त्यांची वेळेत दुरुस्ती अथवा बदली न झाल्याने पावसाळ्यात परिस्थिती गंभीर होत आहे. काही ठिकाणी विद्युत पोल थेट भर पिकांमध्ये कोसळल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. पोल किंवा वीजतारा पडल्याने शेतीपंपांची वीजवाहिनी तुटते आणि विहिरीतील पाणी उपसा बंद होतो. परिणामी पिकांना पाणी देण्याच्या ऐन गरजेच्या काळात शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

विशेष म्हणजे, या विद्युत वाहिन्यांमुळे केवळ पिकांनाच धोका नसून शेतकरी, शेतमजूर व जनावरांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. भांबोरा येथे काही दिवसांपूर्वी विद्युत तार तुटून पाळीव श्वानाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. सुदैवाने यावेळी मनुष्यहानी टळली. मात्र, तुटलेल्या तारा जमिनीवर पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच वीज वितरण कंपनीने जागे होण्याची गरज आहे.

दुरुस्तीची कामे केवळ कागदावर पूर्ण न करता प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन विद्युत वाहिन्यांची पाहणी करणे आवश्यक आहे. धोकादायक पोल तातडीने बदलणे, सैल व जुन्या तारा व्यवस्थित करणे आणि वीजवाहिन्यांलगतची झाडेझुडपे हटविण्याची कामे प्राधान्याने करावीत. शेतकर्!यांच्या पिकांचे नुकसान आणि संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी वीज वितरण कंपनीने आता ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य सहदेव राठोड यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande