
कोल्हापूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)। कोल्हापुरातील प्रॅक्टिस फुटबॉल क्लब शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. प्रॅक्टिस फुटबॉल क्लबची स्थापना १९२७ साली झाली. आगामी २०२७ हे वर्ष या क्लबचे शतकमहोत्सवी वर्ष आहे. यनिमित्त तयार केलेल्या खास आकर्षक लोगो लोगोचा अनावरण सोहळा रविवार दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वा. आयोजित केला आहे. अशी माहिती प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे अध्यक्ष नितीन सावंत, सेक्रेटरी रमेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत अधिक माहिती सांगताना ते म्हणाले मागील शंभर वर्षांत प्रॅक्टिस क्लबने राज्य आणि देश पातळीवरील अनेक फुटबॉल खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच तयार करून त्यांचे भवितव्य घडविले आहे. हे कार्य आजतागायत सातत्याने सुरू आहे. प्रॅक्टिस क्लबच्या मागील १०० वर्षांच्या देदीप्यमान इतिहासातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी २०२७ वर्ष प्रॅक्टिस क्लब शतकमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या निमित्ताने वर्षभर फुटबॉल खेळविषयक विविध कार्यक्रम, उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन केले आहे. या सर्व कार्यक्रमांसाठी प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा खास आकर्षक लोगो तयार केला आहे.
या लोगोचा अनावरण समारंभ 'शुभंकरोती सांस्कृतिक भवन', केशवराव बाबा सावंत पार्क, जयप्रभा स्टुडिओजवळ, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे रविवार दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वा. आयोजित केला आहे. लोगोचे अनावरण भारतीय महिला फुटबॉल संघाच्या कोच प्रिया पी. व्ही. (केरळ) यांच्या हस्ते, कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली, माधुरीमाराजे छत्रपती अध्यक्ष WIFA, सदस्य AIFF, भागीरथी महिला मंचच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, वैशाली क्षीरसागर अध्यक्ष भगिनी मंच कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.या समारंभासाठी प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे सर्व आजी-माजी खेळाडू, पंच, प्रशिक्षक, पदाधिकारी आणि मान्यवरांना निमंत्रित केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar