
शाईफेक करून विद्यार्थी आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबण्याचा मनुवादी विचारसरणीचा प्रयत्न; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
बीड, 10 ऑगस्ट (हिं.स.)।
रांची येथे झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग (JSSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटी व अनियमिततेच्या विरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA)च्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा जेएनयूच्या संशोधक नेहा बोरा यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि.१०) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. नेहा बोरा यांच्या समर्थनार्थ तसेच रांचीतील घटनेच्या निषेधार्थ आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
लोकशाही मार्गाने विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असताना त्यांचा आवाज दडपण्यासाठी अशा प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करणे हे लोकशाही मूल्यांवर घाला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली.
शाईफेक करून आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा लोकशाहीविरोधी आहे. या घटनेमागील सूत्रधारांचा शोध घेऊन शाईफेक करणाऱ्यांची ओळख पटवावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. ढवळे यांनी केली.
या प्रकरणी जिल्हाधिकारी बीड यांच्या माध्यमातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा तसेच मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग
या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, शेख मुबीन, रामनाथ खोड, शिवशर्मा शेलार, शिवशक्ती-भीमशक्ती विचारमंचचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, माजी सैनिक तथा आम आदमी पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष अशोक येडे, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सादेक सय्यद, नितीन सोनवणे ( राज्य प्रवक्ता तथा जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅंथर सेना बीड) आदी सहभागी झाले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis