
- बैठकीत लोकसंख्या असंतुलनावर मंथनाची शक्यता
- भाजपसह 32 संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार
नागपूर, 10 ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) तसेच संघप्रेरित विविध संघटनांची अखिल भारतीय समन्वय बैठक आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील गुडीलोवा येथे 19 ते 21 ऑगस्टदरम्यान होणार आहे. या बैठकीत यंदा लोकसंख्या असंतुलनाचा मुद्दा विशेष चर्चेत येण्याची शक्यता असून, जनगणना, लोकसंख्येतील बदल आणि त्याचे सामाजिक परिणाम यावरही मंथन होण्याची अपेक्षा आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक समन्वय बैठक आयोजित केली जाते. या बैठकीत संघप्रेरित विविध संघटनांकडून वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला जातो. तसेच आगामी काळातील उपक्रम आणि योजनांबाबत चर्चा केली जाते.यंदाच्या बैठकीत देशातील विविध राज्यांमधील लोकसंख्येच्या रचनेतील बदल, त्यामागील कारणे, त्याचे सामाजिक परिणाम आणि दीर्घकालीन राष्ट्रीय धोरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. विविध संघटना आपापल्या कार्यक्षेत्रातील अनुभव आणि निरीक्षणे बैठकीत मांडण्याची शक्यता आहे.
लोकसंख्या असंतुलनाबरोबरच नशामुक्ती, युवकांमध्ये जागृती, पंच परिवर्तन आणि विकासाची भारतीय संकल्पना यांसारखे विषयही बैठकीच्या अजेंड्यावर राहण्याची शक्यता आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनाशी संबंधित विविध प्रश्नांवर विचारविनिमय आणि संघटनांमधील समन्वय वाढविण्याचे व्यासपीठ म्हणून या बैठकीकडे पाहिले जाते.
या बैठकीला संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सर्व सहसरकार्यवाह तसेच अखिल भारतीय कार्य विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याशिवाय भारतीय जनता पक्ष, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सक्षम, राष्ट्र सेविका समिती यांसह संघ परिवारातील 32 संघटनांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
प्रत्येक संघटना आपल्या वर्षभरातील कार्याचा आढावा सादरणार आहे. सामाजिक प्रश्नांवर परस्पर समन्वय वाढविणे, जनकल्याणाशी संबंधित उपक्रम अधिक प्रभावी करणे तसेच धोरणात्मक विषयांवर संवाद वाढविण्याबाबतही बैठकीत चर्चा होणार आहे.
लोकसंख्या असंतुलनाचा मुद्दा संघाच्या व्यापक सामाजिक अजेंड्यावर कोणत्या स्वरूपात पुढे येतो आणि त्यासंदर्भात कोणत्या भूमिका मांडल्या जातात, याकडे राजकीय तसेच सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.--------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी