
लातूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)।
: लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करत स्थानिक गुन्हे शाखेने नावंदी (ता. उदगीर) येथील शेतात सुरू असलेल्या ‘तिर्रट’ जुगारावर छापा टाकला. या कारवाईत ५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, १५ लाख २ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांची चाहूल लागताच ४ जण घटनास्थळावरून पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नावंदी गावातील एका शेतात चिंचेच्या झाडाखाली मोकळ्या जागेत काही जण ‘तिर्रट’ जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने दुपारी सुमारे ३ वाजता अचानक छापा टाकला.
पोलिसांची चाहूल लागताच काही जण घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, माधव भुजंग मोतेवाड (४५), आसीफ सिकंदर मजकुरी (२७), सुदर्शनदेव मुलशंकर कापसे (२४), महेबुब युसुफ शेख (३९) आणि बालाजी गोविंदराव गुट्टे (७२) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान जुगाराचे पत्ते, रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच जुगार खेळण्यासाठी वापरण्यात आलेली वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली. एकूण १५,०२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, गणेश बालाजी पेदेवाड, अली हैदर बागवान, सदा राठोड आणि बस्वराज ऊर्फ राजू मिंचे हे पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२(अ) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास वाढवणा पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis