
वर्धा, 10 ऑगस्ट (हिं.स.)। वर्धा जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टच्या सुरुवातीला मात्र पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही.
प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात १३२.२ मिमी सरासरी पाऊस झाला, जो एकूण सरासरीच्या ७५.९ टक्के होता. जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावत २९९.०८ मिमी (१०९.०६ टक्के) पर्जन्यमानाची नोंद केली. मात्र, चालू ऑगस्ट महिन्यात केवळ ७.६ मिमी पाऊस पडला असून ही टक्केवारी अवघी २.०८ टक्के इतकी निराशाजनक आहे. जिल्ह्यात एकूण १४ मोठे व मध्यम प्रकल्प आहेत. जुलै महिन्यातील पावसामुळे महत्त्वाच्या प्रकल्पांमधील जलपातळीत अंशतः वाढ झाली असली, तरी अजूनही एकाही धरणात १०० टक्के जलसाठा झालेला नाही. वर्धा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या धाम प्रकल्पात सध्या ६४.६० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. तर सेलू तालुक्यातील बोर प्रकल्पात ६९.७१ टक्के पाणी साचले आहे. दुसरीकडे, मदन उन्नई धरण अद्यापही कोरडेच असल्याने चिंता वाढली आहे. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा कोरडा गेल्याने जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठ्या प्रकल्पांना आता पुन्हा एकदा दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
मागील २४ तासांतील पर्जन्यमान(मी.मी.)
वर्धा ०० सेलू ००
देवळी ०.४ आर्वी ००
आष्टी ०० कारंजा ०.२
हिंगणघाट ०.६
समुद्रपूर ०.२
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी