अमरावती जिल्ह्यात पावसाचा ब्रेक ... धरणांत निम्मा जलसाठा
अमरावती, 10 ऑगस्ट (हिं.स.)। जुलैच्या अखेरीस झालेल्या धुव्वांधार पावसाने या महिन्यात विश्रांती घेतली आहे. जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत सरासरी ७८ टक्के पाऊस झाला असून धरणे अद्याप पूर्णतः भरलेली नाहीत. मोठे, मध्यम व लघुप्
जिल्ह्यात पावसाचा ब्रेक ... धरणांत निम्मा जलसाठा


अमरावती, 10 ऑगस्ट (हिं.स.)।

जुलैच्या अखेरीस झालेल्या धुव्वांधार पावसाने या महिन्यात विश्रांती घेतली आहे. जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत सरासरी ७८ टक्के पाऊस झाला असून धरणे अद्याप पूर्णतः भरलेली नाहीत. मोठे, मध्यम व लघुप्रकल्पांत ५५ टक्के जलसाठा झाला आहे. नदी-नाल्यांचेही पात्र पुरेसे भरलेले नाहीत. त्यामुळे आगामी दीड महिन्यात सरासरी इतका पाऊस न झाल्यास जिल्ह्यावरील जलसंकटाची छाया अधिक गडद होणार आहे. पावसाच्या पाण्यावर सिंचन प्रकल्पातील जलसाठा अवलंबला आहे. तर सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यावर पिण्याचा पाणीपुरवठा व सिंचनासह औद्योगिक वसाहतींचा पुरवटा अवलंबून आहे. एक जून ते नऊ ऑगस्ट, या कालावधीत जिल्ह्यात ४९६ मिमी सरासरी पावसाची अपेक्षा आहे. त्या तुलनेत या कालावधीत प्रत्यक्षात ३८७ मिमी पाऊस झाला असून त्याचे प्रमाण सरासरी ७८ टक्के आहे. यंदा ‘एल निनो’च्या प्रभावाने मॉन्सून कमजोर झाला असल्याने पर्जन्यमानाची सरासरी कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. जून व जुलै या पावसाच्या पहिल्या दोन महिन्यांत ८८ टक्के पाऊस झाला आहे. अपेक्षित ४२३ मिमीच्या तुलनेत ३७३ मिमी पाऊस प्रत्यक्षात झाला असून तूट कायम आहे. ऑगस्टमधील पहिले नऊ दिवस जवळपास कोरडे गेले आहेत. या नऊ दिवसांत जिल्ह्यात सरासरी १४ मिमी पाऊस झाला असून त्याचे अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत प्रमाण १९ टक्के आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी दमदार स्वरूपाची नसल्याने सिंचन प्रकल्पांतील जलपातळी व साठा वाढू शकलेला नाही. जिल्ह्यात एक मोठा, सात मध्यम व ४८ लघू, असे ५६ सिंचनप्रकल्प आहेत. या प्रकल्पातील जलसाठ्यावर शहरी व ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसह सिंचन आणि औद्योगिक वसाहतींचा पुरवठा अवलंबून आहे. सद्यस्थितीत एकूण सिंचन प्रकल्पांत ५७९ दलघमी जलसाठा झाला आहे. एकूण प्रकल्पीय पाणीसाठ्याच्या तुलनेत तो ५५ टक्के आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पावसावर सिंचन प्रकल्पातील साठा अवलंबून असतो. या महिन्यातील पहिले नऊ दिवस कोरडे गेले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १५ ऑगस्टपर्यंत पावसाचे प्रमाण अल्प प्रमाणांत राहणार आहे. त्यानंतर त्याची हजेरी कशी राहते, यावर सिंचन प्रकल्पांतील पाणीसाठ्याचे भविष्य अवलंबून आहे. या दीड महिन्यात पावसाने सरासरी न गाठल्यास आगामी काळात पाणीपुरवठ्यासह सिंचनासाठी अडचणी जाणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande