
रत्नागिरी, 10 ऑगस्ट (हिं.स.) । सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला.
डॉ. कंदेवाड यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर, ता. चिपळूण, आयुष्मान आरोग्य मंदिर भिले, ता. चिपळूण, ग्रामीण रुग्णालय गुहागर तसेच तालुका आरोग्य अधिकारी, गुहागर कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी संबंधित आरोग्य संस्थांमधील विविध विभाग, उपलब्ध आरोग्य सुविधा, औषधसाठा, मनुष्यबळ तसेच नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची पाहणी करून कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
आरोग्य सेवा अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण व नागरिकाभिमुख पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कुमार कांबळे, डॉ. सत्यार्थ प्रकाश बळवंत तसेच चिपळूण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव आदी उपस्थित होते. संबंधित आरोग्य संस्थांचे वैद्यकीय अधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी संचालकांना संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली.
डॉ. कंदेवाड यांनी आरोग्य संस्थांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. नागरिकांना दर्जेदार, सुलभ, तत्पर व वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता राखणे, उपलब्ध साधनसामग्रीचा प्रभावी वापर करणे तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी