वर्धेत मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला वेग
वर्धा, १० ऑगस्ट (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा (एसआयआर) सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. या प्रक्रियेसाठी १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता तारीख निश्चित करण्यात आली असून, मतदार यादी अचूक, अद्ययावत आण
मतदार यादी दुरुस्तीचे सुधारित वेळापत्रक जाहीर 27 ऑक्टोबरला जाहीर होईल अंतिम यादी


वर्धा, १० ऑगस्ट (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा (एसआयआर) सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. या प्रक्रियेसाठी १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता तारीख निश्चित करण्यात आली असून, मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि त्रुटीरहित करण्यावर भर देण्यात येणार आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांच्यामार्फत घरोघरी भेट देऊन मतदारांकडून आवश्यक माहिती व फॉर्म संकलित करण्यात येणार आहेत. त्यानंतर मतदान केंद्रांचे तर्कसंगतीकरण करून प्रारूप मतदार यादीची तयारी करण्यात येईल. प्रारूप मतदार यादी ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येतील.

दावे व हरकतींची सुनावणी, पडताळणी तसेच त्यावरील निर्णयाची प्रक्रिया ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणार आहे. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याचे प्राथमिक वेळापत्रकात नमूद आहे. मात्र, महाराष्ट्रासाठीच्या सुधारित एसआयआर कार्यक्रमात २२ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे वेळापत्रक देण्यात आले आहे.

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांनी आपले नाव, पत्ता आणि इतर तपशील योग्य आहेत की नाही, याची खात्री करावी. नाव किंवा अन्य तपशीलात काही त्रुटी आढळल्यास विहित कालावधीत दावा अथवा हरकत दाखल करावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

मतदार यादीत नाव नसल्यास संबंधित नागरिकाला निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या पुनरीक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी, तसेच हा संदेश जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बीएलओकडे कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

आर्वीचे तहसीलदार हरिष काळे यांनी सांगितले की, तहसील प्रशासनाच्या वतीने एसआयआर प्रक्रियेसाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी बीएलओची नियुक्ती करण्यात आली असून, मतदारांनी घरी येणाऱ्या बीएलओकडे आवश्यक कागदपत्रे व माहिती सादर करावी. फॉर्म भरण्यासाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन दोन्ही सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाच्या नागरिक सेवा पोर्टलवर SIR-२०२६ अंतर्गत Enumeration Form भरणे, मागील SIRमधील नाव शोधणे तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत.

मतदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीच्या आधारे आपले नाव आणि तपशील तपासावेत, तसेच पुनरीक्षण प्रक्रियेत वेळेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande