परभणीच्या ग्रामीण कलाकाराच्या सात कलाकृतींना मुंबईतील आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात स्थान
परभणी, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मातीशी नाळ जोडून कलेच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करण्याची जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर परभणीच्या ग्रामीण भागातील कलाकार सुशीलकुमार एन. घुंबरे ऊर्फ काका यांच्या सात कलाकृतींना मुंबईतील आंतरराष्ट्रीय सामूह
अ


परभणी, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मातीशी नाळ जोडून कलेच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करण्याची जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर परभणीच्या ग्रामीण भागातील कलाकार सुशीलकुमार एन. घुंबरे ऊर्फ काका यांच्या सात कलाकृतींना मुंबईतील आंतरराष्ट्रीय सामूहिक चित्र प्रदर्शनात स्थान मिळाले आहे. ‘कला कनेक्ट’ प्रस्तुत ‘फ्रीडम सीझन-3’ हे आंतरराष्ट्रीय सामूहिक चित्र प्रदर्शन व पुरस्कार सोहळा 11 ते 13 ऑगस्टदरम्यान मुंबईतील नेहरू सेंटर, डॉ. नी बेझंट रोड, वरळी येथील एसी आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 12 ते रात्री 7 या वेळेत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहणार आहे. सिद्धार्थ कर्मकार आर्ट फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या प्रदर्शनाचे क्युरेशन प्रसिद्ध कलाकार सिद्धार्थ कर्मकार यांनी केले आहे.

देश-विदेशातील कलाकारांच्या कलाकृतींसह परभणीच्या सुशीलकुमार घुंबरे यांच्या कलाकृती या प्रतिष्ठित व्यासपीठावर प्रदर्शित होणार असल्याने जिल्ह्याच्या कलाक्षेत्रासाठी ही उल्लेखनीय बाब मानली जात आहे. या प्रदर्शनात घुंबरे यांच्या एकूण सात रंगचित्रांचा समावेश आहे. त्यांच्या कलाकृतींमध्ये विषयांची विविधता, रंगांचा प्रभावी वापर आणि भावनिक खोली जाणवते. ‘डिव्हिनिटी कार्व्हड इन स्टोन’ या कलाकृतीत दगडात कोरलेल्या गणेशमूर्तीच्या माध्यमातून आध्यात्मिक शांतता व्यक्त करण्यात आली आहे. ‘द क्राय ऑफ द फॉरेस्ट’ या चित्रातून जंगल आणि पर्यावरणाविषयीची संवेदनशीलता अधोरेखित होते. ‘नेचर फ्लोरल हार्मनी’मध्ये फुलांच्या माध्यमातून रंग आणि सौंदर्याचा उत्सव साकारण्यात आला आहे. ‘मेमरी इन ओल्ड सिटी’ या कलाकृतीत जुन्या शहरातील आठवणी, जीवनशैली आणि वारशाचे दर्शन घडते. ‘इन सर्च ऑफ लाइट’ या कलाकृतीत अंधारातून प्रकाशाकडे जाणार्या आशावादी प्रवासाचे अमूर्त रूप मांडण्यात आले आहे. ‘स्टिल लाइफ’मध्ये दैनंदिन वापरातील वस्तूंमधील सौंदर्य आणि निळ्या बाटल्यांमधील रंगछटांचा प्रभावी खेळ पाहायला मिळतो. तर 24 बाय 36 इंच आकाराच्या ‘डिव्हाइन गेज’ या मोठ्या कॅनव्हासवरील रंगीबेरंगी व्यक्तिचित्रातून दैवी भाव व्यक्त करण्यात आला आहे.

‘कला कनेक्ट’, सिद्धार्थ कर्मकार आर्ट फाऊंडेशन आणि संबंधित संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘फ्रीडम सीझन-3’च्या माध्यमातून सृजनशीलता, अभिव्यक्ती आणि कलात्मक उत्कृष्टतेचा संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. परभणीच्या मातीतून साकारलेल्या या सात कलाकृती मुंबईतील प्रतिष्ठित व्यासपीठावर झळकणार असल्याने ग्रामीण भागातील नवोदित कलाकार आणि विद्यार्थ्यांसाठीही हा प्रेरणादायी प्रवास ठरणार आहे.

चित्रशैलीतील वैविध्य ठरते वैशिष्ट्य...

एकाच विषयाभोवती कलानिर्मिती करण्याऐवजी घुंबरे यांनी व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, अमूर्त चित्रण, वस्तुचित्रण आणि रचनाचित्र अशा विविध चित्रप्रकारांमध्ये काम केले आहे. वास्तववादी चित्रण, निसर्गचित्रण, क्रेलिक रंगांवरील प्रभुत्व आणि प्रत्येक कलाकृतीतून जाणवणारी मातीशी असलेली नाळ व आध्यात्मिक भावविश्व ही त्यांच्या चित्रकलेची वैशिष्ट्ये आहेत. ग्रामीण भागात मर्यादित साधनसामग्रीच्या उपलब्धतेतून कलासाधना करत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय प्रदर्शनापर्यंत मजल मारणार्या घुंबरे यांच्या या यशामुळे परभणीच्या कलाक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. नेहरू सेंटरसारख्या प्रतिष्ठित कलादालनात परभणीच्या मातीतील कलाकाराच्या कलाकृती प्रदर्शित होणे हा जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे. ‘कला ही कोणत्याही शहराची, जातीची किंवा श्रीमंतीची मोहताज नसते; ती मनातून येते,’ हा संदेश घुंबरे यांच्या कलाप्रवासातून अधोरेखित होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande