छ. संभाजीनगरात कोळी महादेव, कोळी मल्हार जात वैधता प्रमाणपत्रासाठी ठिय्या आंदोलन
छत्रपती संभाजीनगर, १० ऑगस्ट (हिं.स.) : कोळी महादेव आणि कोळी मल्हार जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने आदि
छ. संभाजीनगरात कोळी महादेव, कोळी मल्हार जात वैधता प्रमाणपत्रासाठी ठिय्या आंदोलन


छत्रपती संभाजीनगर, १० ऑगस्ट (हिं.स.) : कोळी महादेव आणि कोळी मल्हार जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव शहरात दाखल झाले होते. आंदोलकांची संख्या लक्षात घेता पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आदिवासी विकास विभागाच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या कार्यालयासमोर हजारो आदिवासी बांधवांनी आंदोलन करत आपल्या मागण्या मांडल्या. कोळी महादेव आणि कोळी मल्हार जमातीच्या नागरिकांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणांमध्ये अडचणी निर्माण होत असून, तपासणी समितीकडून अनेक प्रकरणे अवैध ठरवली जात असल्याचा आरोप आंदोलक संघटनेने केला आहे.

याच मागणीसाठी यापूर्वी १२ दिवस अन्नत्याग उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी संबंधित समितीला ६० दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदत उलटूनही ठोस निर्णय न झाल्याने पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.

आंदोलनादरम्यान काही आंदोलक आक्रमक झाल्याचेही दिसून आले. यावेळी आंदोलकांशी संवाद साधला असता, जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नावर न्याय मिळावा आणि प्रलंबित प्रकरणांवर योग्य तो निर्णय घ्यावा, यासाठी आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून परिसरात अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande