परभणीतील गॅस ग्राहकांसाठी ११ ते १६ ऑगस्ट दरम्यान ई-केवायसी विशेष मोहिमेचे आयोजन
परभणी, 10 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्ह्यातील सर्व गॅस कंपन्यांच्या (इंडेन, भारत गॅस, एच.पी. गॅस इत्यादी) नोंदणीकृत लाभार्थ्यांचे ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्यासाठी दिनांक ११ ऑगस्ट २०२६ ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विशेष मोहीम व कॅम्पचे आयोजन करण्यात आले
परभणीतील गॅस ग्राहकांसाठी ११ ते १६ ऑगस्ट दरम्यान ई-केवायसी विशेष मोहिमेचे आयोजन


परभणी, 10 ऑगस्ट (हिं.स.)।

जिल्ह्यातील सर्व गॅस कंपन्यांच्या (इंडेन, भारत गॅस, एच.पी. गॅस इत्यादी) नोंदणीकृत लाभार्थ्यांचे ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्यासाठी दिनांक ११ ऑगस्ट २०२६ ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विशेष मोहीम व कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी दिली आहे.

शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार, गॅस जोडणीधारकांचे e-KYC पूर्ण असणे अनिवार्य आहे. e-KYC अपूर्ण राहिल्यास लाभार्थ्यांना शासनाच्या अनुषंगिक सुविधा अथवा अनुदानाचा (Subsidy) लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील प्रलंबित e-KYC चे काम मुदतीत पूर्ण करण्यासाठी तहसील स्तरावर विशेष मोहीम राबवली जात आहे.

*लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना व आवाहन:*

विशेष मोहीम कालावधी: ११ ऑगस्ट २०२६ ते १६ ऑगस्ट २०२६.

*ठिकाण:* तालुक्यातील सर्व तहसील कार्यालये, नागरी व ग्रामीण भागातील नियुक्त केंद्रे आणि संबंधित गॅस वितरक (गॅस एजन्सी) कार्यालये.

*आवश्यक कागदपत्रे:* गॅस पासबुक/ग्राहक क्रमांक (Consumer ID), आधार कार्ड व नोंदणीकृत मोबाईल क्रमांक.

*कृती:* ज्या लाभार्थ्यांचे e-KYC प्रलंबित आहे, त्यांनी तात्काळ आपल्या गॅस वितरकाशी संपर्क साधून अथवा आयोजित विशेष कॅम्पमध्ये उपस्थित राहून e-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

सदर मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत, तलाठी, कोतवाल, रास्त भाव धान्य दुकानदार व गॅस वितरकांमार्फत व्यापक पूर्वसूचना व प्रसिद्धी दिली जात आहे. तांत्रिक कारणांमुळे e-KYC न झालेल्या ग्राहकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून गॅस कंपन्यांना पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तरी परभणी जिल्ह्यातील सर्व गॅसधारकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन आपले e-KYC १००% पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande