
यवतमाळ, १० ऑगस्ट (हिं.स.) : मनपूर, म्हसोला, अर्जुना, किन्ही यासह परिसरातील शेकडो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी यवतमाळ शहरात ये-जा करतात. मात्र विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत या मार्गावर पुरेशी एसटी बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सकाळच्या वेळेत बसअभावी शाळा-महाविद्यालयात वेळेवर पोहोचणे कठीण होत असून, सायंकाळी परतीच्या प्रवासासाठी विद्यार्थ्यांना तासन्तास बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगार प्रमुखांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांसाठी तातडीने अतिरिक्त बससेवा सुरू करण्याची मागणी केली. बसअभावी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी वाढण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मनपूर हे जंगलालगतचे गाव असल्याने सायंकाळी उशिरा घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्येही चिंता आहे. सध्या उपलब्ध असलेल्या बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता असून, विद्यार्थ्यांची गैरसोय दिवसेंदिवस वाढत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मनपूर ते यवतमाळ सकाळी ११.१५ वाजता आणि यवतमाळ ते मनपूर सायंकाळी ५.३० वाजता विशेष बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी आपचे जिल्हा प्रमुख मोबीन शेख, प्रशांत देवकते, अविनाश धनेवार, आकाश चमेडीया, शुभम चांदेकर, दिनकर खांडेकर, उषा श्रीराम, भारती पिसाळकर आणि प्रतीक्षा रहांगडाले उपस्थित होते.
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी