
परभणी, १० ऑगस्ट (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२६-२७ या वर्षासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांना ९ ते १८ अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ९० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या बचत गटांनी १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेसाठी इच्छुक बचत गट अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. बचत गटाचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे आणि गटात किमान १० सदस्य असणे आवश्यक आहे. त्यापैकी किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असणे गरजेचे आहे. तसेच गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जातीचे असणे आवश्यक आहे.
गटातील सर्व सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. त्यांच्याकडे सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जात व रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. बचत गटाचे बँक खाते अध्यक्ष व सचिव यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असावे.
पूर्वी लाभ घेतलेला नसावा
बचत गटाने किंवा गटातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच गटातील किमान एका सदस्याकडे सक्षम अधिकाऱ्यांचा ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना किंवा ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
३.१५ लाखांपर्यंत अनुदान
मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांच्या खरेदीची कमाल मर्यादा ३.५० लाख रुपये आहे. बचत गटाने एकूण किमतीच्या १० टक्के म्हणजेच ३५ हजार रुपये स्व-हिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या ९० टक्के रकमेपर्यंत, कमाल ३.१५ लाख रुपये शासकीय अनुदान अनुज्ञेय राहणार आहे.
योजनेअंतर्गत अनुज्ञेय ९ ते १८ अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेचा ट्रॅक्टर खरेदी केल्यास अनुदानाच्या कमाल मर्यादेपेक्षा अधिक होणारा खर्च संबंधित बचत गटाला स्वतः करावा लागणार आहे.
जास्त अर्ज आल्यास लॉटरीद्वारे निवड
निर्धारित उद्दिष्टापेक्षा अर्जांची संख्या अधिक झाल्यास पात्र अर्जदारांची निवड ड्रॉ (लॉटरी) पद्धतीने करण्यात येणार आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे व प्रस्ताव परिपूर्ण स्वरूपात सादर करण्याची संपूर्ण जबाबदारी बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांची राहणार आहे.
बचत गटाने ३५ हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट ‘Assistant Commissioner Social Welfare Parbhani’ या नावे काढणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची हार्डकॉपी आणि डिमांड ड्राफ्ट संबंधित कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे.
यापूर्वी अर्ज करूनही लाभ न मिळालेल्या तसेच वरील सर्व अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील बचत गटांनी नव्याने अर्ज सादर करावेत. अर्ज samajkalyanparbhani.com या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, परभणी आर. एच. एडके यांच्या वतीने करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis