
लातूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)।
माजी मुख्यमंत्री लोकनेते दिवंगत विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लातूरमध्ये ‘स्वरविलास संगीत दरबार’ या अभिजात शास्त्रीय संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले असून शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दयानंद सभागृह, लातूर येथे हा संगीत दरबार रंगणार आहे. या अभिजात संगीत मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदाच्या स्वरविलास संगीत दरबारात पुणे येथील विख्यात पखावज वादक कृष्णा साळुंखे यांचे दमदार पखावज वादन, तसेच लातूरच्या प्रसिद्ध गायिका डॉ. वृषाली देशमुख यांचे शास्त्रीय गायन रसिकांना अनुभवता येणार आहे. अभिजात भारतीय संगीताची समृद्ध परंपरा रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आणि खुला आहे.
लातूरची सांस्कृतिक चळवळ सजीव ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या आवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने या संगीत दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे. मागील १३८ महिन्यांपासून प्रतिष्ठानकडून शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसारासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या संगीत उपक्रमामागे राज्याचे माजी मंत्री सहकारमहर्षी मा. दिलीपराव देशमुख यांची संकल्पना व प्रेरणा आहे.
‘स्वरविलास संगीत दरबार’च्या माध्यमातून यापूर्वी मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. संजीव अभ्यंकर तसेच किराणा घराण्याचे जगविख्यात गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या बहारदार गायनाचा अनुभव लातूरच्या रसिकांना मिळाला आहे.
या वर्षीही दर्जेदार शास्त्रीय संगीताची मैफल ऐकण्याची संधी लातूरकरांना मिळणार असून, संगीतप्रेमींमध्ये या कार्यक्रमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis