पवित्र पोर्टल मंदावले; शिक्षक भरतीतील उमेदवारांची चिंता वाढली
अमरावती, 10 ऑगस्ट (हिं.स.)। शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येत असलेल्या शिक्षक मेगा भरतीप्रक्रियेतील पसंतीक्रम नोंदवून शाळा निवड व लॉक करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र ऐन भरतीप्रक्रियेच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोर्टलची साईट मंदा
पवित्र पोर्टलची गती मंदावली


अमरावती, 10 ऑगस्ट (हिं.स.)। शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येत असलेल्या शिक्षक मेगा भरतीप्रक्रियेतील पसंतीक्रम नोंदवून शाळा निवड व लॉक करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र ऐन भरतीप्रक्रियेच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोर्टलची साईट मंदावली असून वारंवार ठप्प होत असल्याने हजारो टीएआयटी उत्तीर्ण व पात्र उमेदवारांची मोठी गैरसोय होत आहे. शाळा निवडप्रक्रियेसाठी अवघे दोनच दिवस शिल्लक राहिल्याने वेळेत प्रक्रिया पूर्ण होईल की नाही, याची चिंता भावी शिक्षकांना सतावत आहे.

शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांसाठी शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया सुरू केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे राज्यातील अनेक शाळांमध्ये अध्यापनावर परिणाम होत असून, अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे कार्यरत शिक्षकांवरील कामाचा ताणही वाढला आहे. अशा परिस्थितीत ही मेगा भरतीप्रक्रिया महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना आपल्या पात्रतेनुसार व पसंतीक्रमानुसार शाळांची निवड करून ती लॉक करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया ११ ऑगस्टपर्यंत पूर्ण करायची आहे. त्यामुळे हजारो उमेदवार संगणक केंद्रे व सायबर कॅफेमध्ये गर्दी करीत आहेत.

मात्र पोर्टल संथगतीने चालणे, वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होणे तसेच पसंतीक्रम भरल्यानंतर लॉक प्रक्रिया पूर्ण न होणे, यामुळे उमेदवारांना तासन् तास प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेकांना संगणक केंद्रांच्या वारंवार चकरा माराव्या लागत असून, वेळ आणि पैशाचे नुकसान सहन करावे लागत आहे. प्रक्रियेसाठी आता केवळ एकच दिवस शिल्लक असल्याने तांत्रिक अडचणींमुळे काही उमेदवारांची शाळा निवडप्रक्रिया अपूर्ण राहिल्यास त्यांना भरतीप्रक्रियेत नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शाळा निवड व लॉक प्रक्रियेसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी भावी शिक्षकांकडून जोर धरत आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे यांनी सांगितले की, कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होता कामा नये. पोर्टलवरील समस्या निकाली काढण्यासह विद्यार्थ्यांना वाढीव वेळ देणे आवश्यक आहे. याकरिता तातडीने पोर्टल समस्या, शाळा पसंतीक्रम लॉक करण्यासाठी व वाढीव वेळ मिळण्यासाठी संबंधित मंत्रीमहोदयांकडे पाठपुरावा करणार.

--------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande