
वन विभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
यवतमाळ, 10 ऑगस्ट (हिं.स.) : मागील दोन महिन्यांपासून मुळावा गावातील मुख्य चौकासह गल्लीबोळ आणि नागरिकांच्या घरांच्या छतांवर तीन माकडांचा मुक्तसंचार सुरू असून, त्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माकडांच्या हल्ल्यात एका महिला आणि एका पुरुषास गंभीर दुखापत झाली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुख्य चौक, गल्लीबोळ तसेच घरांच्या अंगणात आणि छतांवर अचानक माकडे येत असल्याने नागरिकांची धावपळ उडत आहे. काही घरांतील वस्तूंची नासधूसही माकडांकडून होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विशेषतः दुपारच्या वेळी माकडांचा वावर अधिक वाढत असल्याने महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
रस्त्यावरून जाताना अचानक माकड समोर आल्यास काय करावे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. माकडांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास ती आक्रमक होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ उपद्रवापुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर बनला आहे.
माकडांचा वाढता उपद्रव लक्षात घेता वन विभागाने मुळावा येथे तातडीने पथक पाठवून परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. माकडांना सुरक्षितरीत्या पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान, माकडांच्या उपद्रवाबाबत माहिती मिळाल्यानंतर वन विभागाकडून पाहणी करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी, उमरखेड, डी. एन. पवार यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी माकडांना चिथावू नये, त्यांना खाऊ देऊ नये आणि त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी