
दत्तक प्रक्रिया गतिमान; दत्तक ग्रहण नियमावली २०२२ अंतर्गत तीन प्रकरणांना मंजुरी
रायगड, १० ऑगस्ट (हिं.स.) : जिल्ह्यातील तीन अनाथ व निराधार बालकांना आता सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कुटुंबाचा आधार मिळाला आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील दत्तक प्रक्रिया अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याचे निर्देश दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत दत्तक ग्रहण नियमावली २०२२ अंतर्गत तीन दत्तक प्रकरणांना मंजुरी दिली.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष किशन जावळ यांच्या परवानगीने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मंजूर झालेल्या तीन प्रकरणांपैकी दोन प्रकरणे संस्थात्मक दत्तकाची आहेत. या प्रकरणांमध्ये संस्थांमध्ये संगोपन होत असलेल्या बालकांना कायदेशीर प्रक्रियेद्वारे कायमस्वरूपी कुटुंब मिळाले आहे. तर एका बालकाचे नात्यांतर्गत (Relative Adoption) दत्तक प्रकरण मंजूर करण्यात आले आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संबंधित विशेष दत्तक संस्था आणि केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) यांच्या समन्वयातून CARINGS या ऑनलाइन प्रणालीद्वारे पारदर्शकपणे आणि नियमानुसार पूर्ण करण्यात आली.
दरम्यान, जिल्ह्यातील प्रलंबित दत्तक प्रकरणे तातडीने निकाली काढण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रत्येक निराधार बालकाला सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कुटुंब मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, आगामी काळात दत्तक प्रक्रियेला आणखी गती देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पात्र आणि इच्छुक दाम्पत्यांनी शासनाच्या अधिकृत प्रक्रियेद्वारे दत्तक घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाने केले आहे. अधिकृत दत्तक प्रक्रियेसाठी इच्छुक दाम्पत्यांनी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
---------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)