ऑपरेशन यात्री सुरक्षा’अंतर्गत परभणीत तीन संशयित ताब्यात
परभणी, 10 ऑगस्ट (हिं.स.)।‘ प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), केंद्रीय तपास शाखा (सीआयबी-डी अँड आय) आणि लोहमार्ग पोलीस यांच्या संयुक्त पथकाकडून रेल्वे स्थानके व गाड्यांमध्ये सातत्याने गस्त
ऑपरेशन यात्री सुरक्षा’अंतर्गत परभणीत तीन संशयित ताब्यात


परभणी, 10 ऑगस्ट (हिं.स.)।‘ प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), केंद्रीय तपास शाखा (सीआयबी-डी अँड आय) आणि लोहमार्ग पोलीस यांच्या संयुक्त पथकाकडून रेल्वे स्थानके व गाड्यांमध्ये सातत्याने गस्त आणि निगराणी केली जात आहे. ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’अंतर्गत परभणी रेल्वे स्थानकावर विविध कारवायांमध्ये तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

परभणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर नगरसूल-काचीगुडा एक्स्प्रेसच्या थांब्यादरम्यान सीआयबी-डी अँड आय, नांदेड आणि लोहमार्ग पोलीस, परभणी यांच्या संयुक्त पथकाने संशयितांवर निगराणी ठेवली. प्रवाशांच्या चढ-उताराच्या वेळी मागील जनरल सेकंड क्लास डब्यात प्रवाशांचे सामान व खिसे मारण्याचा प्रयत्न करणार्या दोन संशयितांना पथकाने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयितांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्याविरुद्ध एनसीआर क्रमांक 174/2026 अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 110 व 117 अंतर्गत प्रकरण नोंदविण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.

परभणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर नांदेड-फिरोजपूर एक्स्प्रेसच्या थांब्यादरम्यान सीआयबी-डी अँड आय, नांदेड, आरपीएफ व लोहमार्ग पोलीस, परभणी यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. प्रवाशांच्या चढ-उताराच्या वेळी पुढील जनरल सेकंड क्लास डब्यात प्रवाशांचे सामान चोरण्याचा प्रयत्न करणार्या एका महिला संशयितेला ताब्यात घेण्यात आले. सदर महिलेला पुढील कायदेशीर कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तिच्याविरुद्ध एनसीआर क्रमांक 176/2026 अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 110 व 117 अंतर्गत प्रकरण नोंदविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

नांदेड विभागातील रेल्वे स्थानके आणि गाड्यांमध्ये, विशेषतः प्रवाशांच्या चढ-उताराच्या वेळी, संशयित व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. चोरी, गुन्हेगारी तसेच अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande