जपतलई आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई – डॉ. अशोक उईके
गडचिरोली, १० ऑगस्ट (हिं.स.) : धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा
आदिवासी विकास मंत्रीडॉ.अशोक उईके


गडचिरोली, १० ऑगस्ट (हिं.स.) : धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिला.

या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेत डॉ. उईके म्हणाले की, अनुदानित आश्रमशाळेत अशा प्रकारची घटना घडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून एखादी संस्था आश्रमशाळा चालवत असेल, तर अशा निष्काळजीपणाची गंभीर दखल घेतली जाईल. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही सोडले जाणार नाही.

आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासाची तसेच त्यांच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे ही संबंधित संस्था आणि व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. जपतलई येथील घटनेत कोणत्या स्तरावर त्रुटी अथवा दुर्लक्ष झाले, याची चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असेही मंत्री डॉ. उईके यांनी स्पष्ट केले.

आश्रमशाळांमधील निवासी परिसराची सुरक्षितता, विद्यार्थ्यांची नियमित देखरेख तसेच सर्पदंशासह अन्य संभाव्य धोक्यांपासून बचावासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणा आणि आश्रमशाळा व्यवस्थापनाने आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नाही. आश्रमशाळांमध्ये सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, असेही डॉ. उईके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशित केले.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande