
परभणी, 10 ऑगस्ट (हिं.स.)। गोदावरी नदीवरील उच्च पातळीच्या बंधार्यातून नदीपात्रात सोमवारी दुपारपासून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असून त्यामुळे काठावरील गावांनी कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये म्हणून सतर्कता बाळगावी, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.
पाथरी तालुक्यातील तारुगव्हाण उच्च पातळी बंधार्याच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु झाली आहे. सोमवारी सकाळी या बंधार्यात 92.09 टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. सतत सुरु असणार्या पाण्याची आवक ओळखून लघु पाटबंधारे विभागाने दुपारी 2 वाजल्यापासून बंधार्याचे एक दार उघडून गोदावरी नदीच्या पात्रात 235.04 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला. तर याच नदीवरील ढालेगांव उच्च पातळी बंधार्यातूनही दुपारी 1.45 वाजता 192.38 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला. त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर लघु पाटबंधारे विभागाने कोणीही नदीच्या पात्रात प्रवेश करु नये, कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये या करीता दक्षता बाळगावी, असे आवाहन केले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनानेही या संदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis