
परभणी, 10 ऑगस्ट (हिं.स.)। जिंतूर तालुक्यातील बामणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भोसी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्यात असलेल्या ३० वर्षीय युवकाने चिट्ठी लिहून घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
गणेश आश्रोबा ठोंबरे असे गळफास घेतलेल्या युवकाचे नांव आहे. या प्रकरणी बामणी पोलिसांत अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश ठोंबरे यांनी आपल्या राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नातेवाइकांनी त्यांना तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी मुंडे यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी रुग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान, बामणी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात जाऊन प्राथमिक पंचनामा केला. यावेळी मृताच्या खिशात मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून मी फाशी घेत आहे. सरकारने लवकर आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशा आशयाची चिट्ठी पोलिसांना आढळून आली आहे. मृताच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश ठोंबरे हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्यात होते. याच कारणातून त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी बामणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हवालदार ठाकूर करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis