आधुनिक विज्ञानासोबत प्राचीन ज्ञानाची सांगड घालून नवभारत घडवा -राज्यपाल जिष्णू देव वर्मा
Youth should take inspiration from ancient knowledge to build a new India - Governor Jishnu Dev Verma
Youth-should-take-inspiration


Youth-should-take-inspiration


राज्यपालांच्या उपस्थितीत चतुर्वेद राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

नाशिक, १० ऑगस्ट (हिं.स.) : युवकांनी आधुनिक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासोबतच प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेपासून प्रेरणा घेत नवभारत घडविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.

महर्षि गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान, नाशिक यांच्या वतीने आयोजित चतुर्वेद संमेलन तथा राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, वेदाचार्य रवींद्र पैठणे, प्रतिष्ठानचे संस्थापक ब्रह्मर्षी पंडित शिवकुमार शर्मा, हरिद्वार येथील उत्तराखंड संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रमाकांत पांडे, केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नाशिक परिसराचे संचालक डॉ. नीलाभ तिवारी, धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार स्वागत समितीचे अध्यक्ष प्रा. जयंत भातांबरेकर, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव दीप्ती देशपांडे आदी उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल वर्मा म्हणाले की, युवकांनी आपली संस्कृती समजून घेण्यासोबतच जागतिक दर्जाचे शिक्षण घ्यावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० या दिशेने महत्त्वाची संधी उपलब्ध करून देते. आधुनिक विज्ञान आणि प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचा समन्वय भारताला अधिक सामर्थ्यवान बनवू शकतो.

महर्षि गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान समर्पण भावनेने वेदपरंपरेच्या संरक्षण व संवर्धनाचे कार्य करीत आहे. युवकांना आपल्या मुळांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या संस्थेकडून होत असून, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात त्याचे महत्त्व अधिक आहे. प्रतिष्ठानने राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांसोबत समन्वयाने काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

नाशिक वैदिक व संस्कृत अध्ययनाचे राष्ट्रीय केंद्र व्हावे

नाशिक हे केवळ तीर्थक्षेत्र नसून भारताच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ज्ञानपरंपरेचे महत्त्वपूर्ण केंद्र राहिले आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा परिसर नाशिकमध्ये स्थापित होणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. राज्यातील विद्यार्थी, संशोधक, संस्कृतचे अभ्यासक तसेच भारतीय ज्ञानपरंपरेचे साधक यांनी या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.

आगामी काळात नाशिक हे वैदिक आणि संस्कृत अध्ययनाचे प्रमुख राष्ट्रीय केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वेद ही केवळ आपली परंपरा नसून भविष्यातील सामर्थ्याचा स्रोतही ठरू शकतात. त्यासाठी वेदांचे संरक्षण, त्यावर संशोधन, आधुनिकतेच्या संदर्भात त्यांचा अभ्यास तसेच वेदांचे ज्ञान व मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

वेद आणि भारतीय ज्ञानपरंपरेची ओळख शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे. आधुनिकता आत्मसात करणारे युवक घडवितानाच त्यांना आपल्या संस्कृतीशी जोडणेही आवश्यक आहे. वेद, उपनिषदे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, संत साहित्य आणि भारतीय दर्शनातील मूलभूत विचार विद्यार्थ्यांपर्यंत सुलभ व आधुनिक माध्यमातून पोहोचविले पाहिजेत, असेही राज्यपाल म्हणाले.

वेदांमध्ये विज्ञान, तत्त्वज्ञान आणि मानवकल्याणाचा विचार

राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्काराने सन्मानित व्यक्तींना प्रदान करण्यात आलेले पुरस्कार हा केवळ विद्वत्तेचा सन्मान नसून, मानवतेला सत्य, धर्म, कर्तव्य आणि विश्वकल्याणाचा मार्ग दाखविणाऱ्या भारताच्या महान ज्ञानपरंपरेचा गौरव आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

वेद हे केवळ प्राचीन ग्रंथ नसून भारताच्या ज्ञानचेतनेचे मूलस्रोत आहेत. आचार्य आणि विद्वानांनी मौखिक परंपरेच्या माध्यमातून वेदांचे जतन केले. वेदांमध्ये निसर्ग, विज्ञान, तत्त्वज्ञान, अध्यात्म, जीवनाकडे पाहण्याची दृष्टी तसेच संपूर्ण मानवतेच्या कल्याणाची मंगलकामना आहे, असेही त्यांनी नमूद केले.

केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे नाशिक येथे केंद्र सुरू होत असून, त्यासाठी राज्य शासनाने जमीन उपलब्ध करून दिली आहे. या केंद्रामुळे नाशिकमधून वेदांच्या अभ्यासाची नवी पिढी निर्माण होण्यास मदत होईल, असे डॉ. नीलाभ तिवारी यांनी सांगितले.

कुलगुरू प्रा. रमाकांत पांडे यांनी नाशिक ही धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक नगरी असून, नाशिकचे महात्म्य लक्षात घेऊन येथे संस्कृत विद्यापीठाचे केंद्र सुरू होत असल्याचे सांगितले. या केंद्रामुळे ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालत वेदशास्त्राचा प्रचार व प्रसार करण्यासाठी नवी पिढी पुढे येण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

प्रतिष्ठानचे सचिव वेदाचार्य रवींद्र पैठणे यांनी प्रतिष्ठानच्या गेल्या २५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा सादर केला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमास पुरस्कार समितीचे विश्वास ठाकूर, वैभव जोशी, दीपक बागड, योगाचार्य डॉ. विश्वास देवकर, डॉ. कुमार भट्ट, रामगोपाल अय्यर यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्कारमूर्तींची नावे

वेदाचार्य संतोष कुमार धनपाठी, हैदराबाद — स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय ऋग्वेद पुरस्कार.

वेदाचार्य महेश रेखे धनपाठी, अहिल्यानगर — स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय शुक्ल यजुर्वेद पुरस्कार.

वेदाचार्य श्रीकृष्ण श्रौती गुरुजी, चेन्नई — स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय सामवेद पुरस्कार.

वेदाचार्य रामचंद्र जोशी, तिरुपती — स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय अथर्ववेद पुरस्कार.

वेदाचार्य राजेश्वर देशमुख, पुणे — स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय शास्त्र पुरस्कार.

वेदाचार्य दुर्गादास मुळे — स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय यजुर्वेद सेवावर्ती पुरस्कार.

वेदाचार्य स्व. श्याम सुंदर जोशी — स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय यजुर्वेद सेवावर्ती पुरस्कार; हा पुरस्कार त्यांच्या पत्नीने स्वीकारला.

वेदाचार्य चि. देवव्रत रेखे — स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकर दंडक्रम विक्रमादित्य राष्ट्रीय वेद पुरस्कार (विशेष सन्मान). शाल, मानपत्र आणि रुपये २१ हजार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande