
पुणे, 10 ऑगस्ट (हिं.स.)। औंध जिल्हा रुग्णालयात कोरोना काळात उभारण्यात आलेल्या ५० खाटांच्या अतिदक्षता विभागातील (आयसीयू) साहित्य तसेच कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक निधीच्या खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना सात दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
तीनशे खाटांच्या या जिल्हा रुग्णालयात नियमितपणे १२ खाटांचा अतिदक्षता विभाग मंजूर आहे. मात्र, कोरोना महामारीच्या काळात शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर येथे ५० खाटांचा आधुनिक आयसीयू उभारण्यात आला होता. या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता.
या प्रकरणी आरोग्य कार्यकर्ते शरत शेट्टी यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, ५० खाटांपैकी सध्या केवळ काही खाटाच कार्यरत आहेत. उर्वरित आयसीयूमधील आधुनिक उपकरणे, व्हेंटिलेटर, मॉनिटर्स, ऑक्सिजन व्यवस्था तसेच अन्य महागडे साहित्य नेमके कुठे आहे, त्याचा वापर कोण करत आहे आणि त्याची सद्यस्थिती काय आहे, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
कोरोना काळात उभारण्यात आलेल्या या सुविधेवर कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च झाला असताना त्याचा अपेक्षित वापर होत नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तक्रारीची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. आयसीयूसाठी खरेदी करण्यात आलेले साहित्य, त्याची सद्यस्थिती, वापर तसेच प्रकल्पावर झालेला खर्च याबाबत सविस्तर तपास करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु