
पुणे, 10 ऑगस्ट (हिं.स.)।राज्यातील महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर (सीएचबी) कार्यरत अध्यापकांच्या मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १४ ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत कार्यवाही पूर्ण न झाल्यास संबंधित यंत्रणांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उच्च शिक्षण संचालनालयाने दिला आहे.
उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी याबाबत परिपत्रक काढून महाविद्यालये, विभागीय सहसंचालक आणि विद्यापीठांना सूचना दिल्या आहेत. सीएचबी अध्यापकांच्या नियुक्ती आणि मान्यतेसाठी कार्यपद्धती तसेच कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार नियुक्त्या करण्याबाबत उच्च शिक्षण संचालनालयाने ९ ऑक्टोबर २०२५ आणि २७ जुलै २०२६ रोजी सूचना दिल्या होत्या.
मात्र, सीएचबी अध्यापकांना मान्यता देणे आणि त्यांना मानधन देण्याच्या प्रक्रियेचे अपेक्षित पालन होत नसल्याचे संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे. सीएचबी अध्यापकांना ३१ जुलैपर्यंत मान्यता देण्याच्या सूचना असतानाही अनेक विद्यापीठांकडून मान्यता देण्याची कार्यवाही पूर्ण झालेली नसल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
विभागीय सहसंचालकांनी दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रानुसार नियुक्त केलेल्या सीएचबी अध्यापकांचे प्रस्ताव महाविद्यालयांनी तत्काळ संबंधित विद्यापीठांकडे सादर करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सीएचबी अध्यापकांच्या नियुक्तीसाठी ना हरकत प्रमाणपत्राची प्रकरणे प्रलंबित असल्यास विभागीय सहसंचालकांनी ती तातडीने निकाली काढून संबंधित महाविद्यालयांना प्रमाणपत्रे द्यावीत.
विद्यापीठांनी प्राप्त झालेले सीएचबी अध्यापकांच्या मान्यतेचे प्रस्ताव विनाविलंब निकाली काढून संबंधित अध्यापकांना तत्काळ मान्यता प्रदान करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
महाविद्यालये, विभागीय सहसंचालक आणि विद्यापीठांनी सीएचबी अध्यापकांच्या मान्यतेसंदर्भातील सर्व कार्यवाही १४ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी. त्यानंतर कोणतेही प्रस्ताव प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश उच्च शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु