
सोलापूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)।
प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी पीकविमा भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली. मात्र, सध्या योजनेचे संकेतस्थळच डाऊन असल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना विमा भरता येत नसल्याची अडचण निर्माण झाली आहे. विमा भरण्याची अंतिम मुदत उद्या असल्याने त्यापूर्वी संकेतस्थळ सुरळीत होणार का आणि पेरणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता येणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनच्या पावसाचे उशिरा आगमन झाल्याने तालुक्यात खरीप मशागत आणि पेरणीचा टक्का सुरुवातीला अत्यंत कमी होता. जुलै महिन्यात पेरणीचे प्रमाण सुमारे २२ टक्क्यांपर्यंत होते. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर पुढील काही दिवसांत दमदार पाऊस होईल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांचे वेळेत वाटप केले होते. त्यामुळे बियाणे घरात ठेवून न ठेवता शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर बाजरी, तूर, मका, कांदा आणि सूर्यफुलाची पेरणी सुरू केली. पेरणी केलेल्या पिकांना विमा संरक्षण मिळावे, यासाठी शासनाने ३१ जुलैपर्यंत असलेली विमा भरण्याची मुदत शेतकऱ्यांचा कमी सहभाग लक्षात घेऊन वाढविली.
मात्र, मुदतवाढ मिळाल्यानंतरही प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचे संकेतस्थळ सध्या डाऊन असल्याने शेतकऱ्यांना विमा अर्ज भरताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत उद्या असल्याने उर्वरित शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येईल का, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
पावसाच्या लहरीपणामुळे आधीच खरीप हंगामाबाबत चिंता असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पीकविमा भरण्याच्या तांत्रिक अडचणीची भर पडली आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने संकेतस्थळ तातडीने सुरळीत करून सर्व पात्र शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होण्याची संधी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड