
पुणे, 10 ऑगस्ट (हिं.स.)शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्यालगत हिंजवडी–शिवाजीनगर (लाइन ३) आणि स्वारगेट–पिंपरी-चिंचवड (लाइन १) या दोन प्रमुख मेट्रो मार्गिकांना जोडणाऱ्या स्कायवॉकचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुमारे १५० मीटर लांबीचा हा स्कायवॉक ऑगस्टअखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीएमआरएस) तपासणी झाल्यानंतर तो प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. सुमारे ५.५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेला हा स्कायवॉक दोन्ही मेट्रो स्थानकांच्या कॉनकोर्स क्षेत्रांना थेट जोडणार आहे. त्यामुळे प्रवाशांना स्थानकाबाहेर न पडता एका मार्गिकेवरून दुसऱ्या मार्गिकेवर सहजपणे जाता येणार आहे.
सध्या मेट्रो मार्गिका बदलताना स्थानकाबाहेर पडून रस्त्यावरील वाहतूक ओलांडावी लागण्याची शक्यता असते. स्कायवॉकमुळे ही अडचण दूर होणार असून, प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होईल. हिंजवडीतील आयटी पार्ककडे जाणारे कर्मचारी तसेच पिंपरी-चिंचवड आणि स्वारगेटच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. महामेट्रोचे अतिरिक्त महाव्यवस्थापक चंद्रशेखर तांबवेकर यांनी सांगितले की, पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि गतिमान करण्यासाठी महामेट्रो कटिबद्ध आहे.
शिवाजीनगर येथील दोन्ही मेट्रो मार्गिकांना जोडणाऱ्या १५० मीटर लांबीच्या स्कायवॉकचे काम अंतिम टप्प्यात असून, ऑगस्टअखेरपर्यंत ते पूर्ण होईल. पे-टू-पे क्षेत्राला जोडणाऱ्या या स्कायवॉकमुळे प्रवाशांना स्थानकातून बाहेर न पडता थेट मेट्रो बदलता येणार आहे.सीएमआरएसची तपासणी पूर्ण झाल्यानंतर आणि लाइन ३चे स्थानक प्रवासी सेवेसाठी सुरू झाल्यानंतर हा स्कायवॉक प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु