जळगाव जिल्ह्यात १२ गोवंशाची सुटका, १६.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव, 10 ऑगस्ट (हिं.स.)| जिल्ह्यातील अमळनेर आणि चोपडा पोलिसांनी केलेल्या स्वतंत्र कारवायामध्ये १२ गोवंशाची सुटका करण्यात आली तर दोन वाहनांसह तब्बल १६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.अमळनेर शहरात पोलिसांच्या कारवाईत पिकअप वाहनातून
जळगाव जिल्ह्यात १२ गोवंशाची सुटका, १६.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त


जळगाव, 10 ऑगस्ट (हिं.स.)| जिल्ह्यातील अमळनेर आणि चोपडा पोलिसांनी केलेल्या स्वतंत्र कारवायामध्ये १२ गोवंशाची सुटका करण्यात आली तर दोन वाहनांसह तब्बल १६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.अमळनेर शहरात पोलिसांच्या कारवाईत पिकअप वाहनातून तीन बैलांची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. तर चोपडा येथे रस्त्यालगत संशयास्पद अवस्थेत उभ्या असलेल्या पिकअप वाहनातून तब्बल नऊ गोवंश आढळून आले. दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

अमळनेर शहरातील गलवाडे रोडवरील ढगुबाई मंगल कार्यालय परिसरात ९ ऑगस्ट रोजी सकाळी पोलिसांना एमएच २० ईजी ०९६५ क्रमांकाचे बोलेरो पिकअप वाहन संशयास्पदरीत्या जाताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये तीन बैल आढळून आले. बैलांना वाहनात दाटीवाटीने बांधून नेण्यात येत असल्याचे तपासणीत समोर आले. या प्रकारामुळे त्यांना त्रास होईल अशा पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी चालक किशोर भिका धनगर (२८, रा. धनगर गल्ली, धरणगाव) आणि क्लीनर रोहित वना खैरनार (२१, रा. टोळी, ता. धरणगाव) यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन बैलांसह सुमारे दोन लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन ताब्यात घेतले. या कारवाईत २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ विनोद सोनवणे करीत आहेत. कारवाई दरम्यान वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला.या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोहेकॉ संतोष पारधी करीत आहेत.

दरम्यान, चोपडा शहरातही पोलिसांच्या कारवाईत गोवंशाची वाहतूक उघडकीस आली. जुना शिरपूर रोडवरील हरेश्वर मंदिराजवळील पुलाच्या परिसरात पोलिसांना विनाक्रमांकाची पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप उभी असल्याचे आढळले. वाहनाची अवस्था संशयास्पद होती. मागील दोन्ही टायर फुटलेले होते, तर वाहनाच्या पुढील भागाचेही नुकसान झाले होते.

पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये नऊ गोवंश बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.या गोवंशाची अंदाजे किंमत ४ लाख ३० हजार रुपये, तर पिकअपची किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याने पोलिसांनी एकूण १४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईदरम्यान वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला.या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोहेकॉ संतोष पारधी करीत आहेत. अमळनेर आणि चोपडा येथे झालेल्या या स्वतंत्र कारवायांमुळे जिल्ह्यातील गोवंशाच्या अवैध वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी एकूण १२ गोवंशाची सुटका करत वाहतुकीसाठी वापरलेली वाहने जप्त केली आहेत.या दोन्ही प्रकरणांत एकत्रितपणे १६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande