कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याची दहशत; दीडशे नागरिकांना चावा घेतल्याचा दावा, पोलिसांकडून शोधमोहीम
कल्याण, 10 ऑगस्ट (हिं.स.)। चोर किंवा गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी रस्त्यावर उतरणारे पोलीस सध्या चक्क एका भटक्या कुत्र्याच्या शोधासाठी रस्त्यावर उतरले आहेत. कल्याण पश्चिमेकडील संदीप हॉटेल परिसर आणि आजूबाजूच्या भागात एका भटक्या कुत्र्याने अक्षरशः धुम
kalyan stray dog attack people bitten panic spreads across area


कल्याण, 10 ऑगस्ट (हिं.स.)। चोर किंवा गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी रस्त्यावर उतरणारे पोलीस सध्या चक्क एका भटक्या कुत्र्याच्या शोधासाठी रस्त्यावर उतरले आहेत. कल्याण पश्चिमेकडील संदीप हॉटेल परिसर आणि आजूबाजूच्या भागात एका भटक्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या कुत्र्याने आतापर्यंत जवळपास दीडशे नागरिकांना चावा घेतल्याचा दावा केला जात आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित कुत्र्याला पकडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कल्याण पश्चिम परिसरातील संदीप हॉटेल आणि लगतच्या भागात या भटक्या कुत्र्याचा वावर असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. अचानक नागरिकांवर हल्ला करून त्यांना चावा घेण्याच्या घटना घडत असल्याने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये या कुत्र्याची मोठी भीती आहे. नागरिकांना घराबाहेर पडतानाही सावधगिरी बाळगावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

या भटक्या कुत्र्याने आतापर्यंत जवळपास १५० नागरिकांना चावा घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ भटक्या कुत्र्यांच्या समस्येपुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न बनला आहे. कुत्र्याचा पुन्हा कोणावर हल्ला होण्यापूर्वी त्याला तातडीने पकडण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर पोलीस, स्थानिक नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी मिळून कुत्र्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाची दखल घेत खडकपाडा पोलीस ठाणे आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याची पथके परिसरात दाखल झाली असून, विविध भागांत शोधमोहीम राबवली जात आहे. मात्र हा कुत्रा सतत ठिकाण बदलत असल्याने त्याला पकडणे प्रशासनासाठी आव्हान ठरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल खडकपाडा परिसरात एका भटक्या कुत्र्याने अक्षरशा उच्छाद मांडला होता. रात्रभर चाललेल्या शोधमोहिमेनंतर श्वान पथकाने त्या कुत्र्याला अखेर पकडण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र हा त्रास थांबलेला नाही. आज सकाळी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात दुसऱ्या एका भटक्या कुत्र्याने परत एकदा अचानक धुमाकूळ घालायला सुरुवात केली. स्थानक परिसरातून ये-जा करणारे प्रवासी या कुत्र्याच्या हल्ल्याचे बळी ठरत आहेत. धक्कादायक म्हणजे सकाळपासून अगदी कमी वेळात तब्बल दहा ते पंधरा जणांना या कुत्र्याने चावा घेतल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी तातडीने दाखल न झाल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून या कुत्र्याला सुरक्षितपणे पकडावे, अशी मागणी जोर धरत आहे. आता पोलिसांसह स्थानिक प्रशासनाच्या शोधमोहिमेत हा कुत्रा कधी सापडतो आणि नागरिकांना त्याच्या दहशतीतून कधी दिलासा मिळतो, याकडे कल्याणकरांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande