
पुणे, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मंचर (ता. आंबेगाव) पोलिस ठाण्यात दाखल दूध भेसळ प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, पोलिसांनी आणखी दहा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात यापूर्वी १४ आरोपींना अटक करण्यात आली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात आहेत. त्यामुळे या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची संख्या आता २४ झाली आहे.
याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१५/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह अन्न सुरक्षा व मानके कायदा आणि अन्न सुरक्षा व मानके नियम २०११ मधील तरतुदींनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये संतोष बबन मोरे (४३, रा. शिरापूर, ता. पारनेर), दत्तात्रय रामदास भागवत (४१, रा. खडकवाडी, ता. आंबेगाव), गणेश सुदाम पडवळ (४०, रा. सविंदणे, ता. शिरूर), आनंदा मारुती पवार (५६, रा. टाकळकरवाडी, ता. खेड), कुलदीप प्रकाश पवळे (३०, रा. चव्हाणमळा, ता. खेड), रविराज बबन थोरात (३२, रा. चांडोली बुद्रुक, ता. आंबेगाव), राजेंद्र भगवान सिनलकर (४५, रा. लोणी, ता. आंबेगाव), ओंकार पोपट गिरवले (२८, रा. देवळगाव सिद्धी, ता. नगर), आशिष विठ्ठल लोंढे (३०, रा. लोंढेमळा, एकलहरे, ता. आंबेगाव) आणि सतीश महादू वाबळे (४७, रा. चांडोली खुर्द, ता. आंबेगाव) यांचा समावेश आहे. या प्रकरणातील भेसळीचे स्वरूप, त्यामागील साखळी तसेच संबंधितांची भूमिका याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु