नाशिक–अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्ग पुन्हा रखडणार? भूसंपादनामुळे निविदा लांबणीवर
सोलापूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)। नाशिक–अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्गाच्या कामाला भूसंपादनाचा अडथळा निर्माण झाला असून, वर्षभरापासून रखडलेल्या या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे. ३७४ किलोमीटरच्या या महामार्गासाठी ऑगस्टमध्ये निविदा उघड
road


सोलापूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)।

नाशिक–अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्गाच्या कामाला भूसंपादनाचा अडथळा निर्माण झाला असून, वर्षभरापासून रखडलेल्या या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे. ३७४ किलोमीटरच्या या महामार्गासाठी ऑगस्टमध्ये निविदा उघडण्याचे नियोजन होते. मात्र, भूसंपादन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने निविदा अंतिम करण्याची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.

धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सुमारे ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. मात्र, अहिल्यानगर जिल्ह्यातील भूसंपादन अद्याप अपूर्ण असल्याने संपूर्ण प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला विलंब होत आहे.

हा महामार्ग अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, राहाता, राहुरी आणि नगर या चार तालुक्यांतील गावांमधून जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा आणि तुळजापूर, तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यांतील गावांचा त्यात समावेश आहे.

धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जवळा, हिंगणगाव, आरणगाव, सिरसाव, रोहकल, पांढरेवाडी, उंडेगाव, कांदलगाव, वाडी राजुरी आणि जाखेपिंपरी, तसेच तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी, पिंपळा खुर्द, धोत्री, काटी, देवकुरळी आणि सावरगाव या गावांतील निवाडे पूर्ण झाले आहेत.

सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील भूसंपादनाची प्रक्रिया बहुतांश पूर्ण झाली असली, तरी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, राहाता, राहुरी आणि नगर तालुक्यांतील निवाडा प्रक्रिया सुरू आहे. जमिनीचा ताबा अद्याप मिळालेला नसल्याने महामार्गाचे काम पुढे नेता येत नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले.

अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे एक हजार हेक्टर जमिनीचे भूसंपादन सुरू असून, काही गावांमधील प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात येणार असल्याचे प्रकल्प संचालक स्वप्नील कासार यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande