सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांना 'मानद कर्नल' प्रदान
सोलापूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)उच्च शिक्षणातील उत्कृष्ट नेतृत्व, प्रदीर्घ समर्पण तसेच नॅशनल कॅडेट कोअर (एनसीसी)च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि नेतृत्वगुण रुजविण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळ
grdf


सोलापूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)उच्च शिक्षणातील उत्कृष्ट नेतृत्व, प्रदीर्घ समर्पण तसेच नॅशनल कॅडेट कोअर (एनसीसी)च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि नेतृत्वगुण रुजविण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांना मानद कर्नल पदाची रँक प्रदान करण्यात आली.

भारतीय सैन्यदल आणि एनसीसी महासंचालनालयाच्या वतीने हा सन्मान जाहीर करण्यात आला होता. आज विद्यापीठाच्या नवीन इमारतीतील अहिल्याभवन सभागृहात दिमाखदार सोहळ्यात एनसीसी पुणेचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर एस.पी.एस. रौतेला यांच्या हस्ते डॉ. महानवर यांना कर्नल पदाची रँक, कॅप आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. महानवर यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. यावेळी बोलताना ब्रिगेडियर एस.पी.एस. रौतेला यांनी डॉ. महानवर यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय योगदानाचे कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. एनसीसीच्या माध्यमातून युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, साहस आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी विद्यापीठात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांना मानद कर्नल पदाने सन्मानित करण्यात आल्याचे रौतेला यांनी सांगितले.

कुलगुरू मानद कर्नल म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर विद्यापीठातील सर्व एनसीसी युनिटचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि सैन्यदल यांच्यातील दुवा अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असेही रौतेला यांनी नमूद केले. कुलगुरू डॉ. महानवर यांनी या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भारतीय सैन्यदल आणि एनसीसीकडून मिळालेला हा बहुमान आपल्यासाठी अभिमानाचा आणि भावूक करणारा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्याचा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

भविष्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी एनसीसीमध्ये सहभागी होऊन देशसेवेसाठी पुढे यावे, यासाठी विद्यापीठाचे प्रयत्न अधिक गतिमान केले जातील. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधतानाच त्यांच्यात नेतृत्वगुण, व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्मितीची भावना विकसित करण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल, असे डॉ. महानवर यांनी सांगितले. कार्यक्रमाला प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्र-कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांच्यासह सिनेट व अधिसभा सदस्य, अधिष्ठाता, एनसीसी कमांडर, विविध संकुलांचे संचालक, प्राध्यापक, संवैधानिक व प्रशासकीय अधिकारी तसेच मोठ्या संख्येने एनसीसी छात्र उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande