
पुणे, 10 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे मंचरमार्गे होण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे अपयशी ठरले असून, त्यांच्या निष्क्रियतेमुळेच रेल्वेचा मार्ग दुसरीकडे वळविण्यात आला, असा आरोप भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. ताराचंद कराळे यांनी केला.
पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वेचा पूर्वी प्रस्तावित असलेला मार्ग कायम ठेवण्यासाठी भाजपच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे कराळे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. समितीच्या अहवालानंतर रेल्वे मार्गाबाबत पुढील दिशा स्पष्ट होईल, असे त्यांनी नमूद केले. मंचरमार्गे हायस्पीड रेल्वे नेल्यास या भागातील दळणवळण, उद्योग आणि रोजगाराला चालना मिळण्यास मदत होईल, अशी भूमिका भाजपकडून मांडण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वीचा प्रस्तावित मार्ग कायम ठेवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे कराळे यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु