पुणे : भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर पोलिसांची कारवाई
पुणे, 10 ऑगस्ट (हिं.स.)।भाडेकरूंची माहिती पोलिसांना न देणाऱ्या घरमालकांसह खासगी वसतिगृह (पीजी) चालकांविरुद्ध पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. भाडेकरूंची माहिती न दिल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम २२३नुसार कारवाई करण्
Pune Police


पुणे, 10 ऑगस्ट (हिं.स.)।भाडेकरूंची माहिती पोलिसांना न देणाऱ्या घरमालकांसह खासगी वसतिगृह (पीजी) चालकांविरुद्ध पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. भाडेकरूंची माहिती न दिल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम २२३नुसार कारवाई करण्यात येत आहे.

पुणे शहराचा झपाट्याने विस्तार होत असून, नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी मोठ्या संख्येने नागरिक शहरात स्थायिक होत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था तसेच गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर शहरात वास्तव्यास आलेल्या नागरिकांची माहिती पोलिसांकडे असणे आवश्यक आहे.

शहरात अनेक नागरिक भाडेतत्त्वावर सदनिका, बैठ्या चाळीतील घरे तसेच अन्य निवासस्थानी राहत आहेत. परगावाहून शिक्षण आणि नोकरीसाठी येणारे अनेक विद्यार्थी व तरुण खासगी वसतिगृहांमध्ये (पीजी) वास्तव्यास आहेत. अशा भाडेकरूंची माहिती संबंधित घरमालकांनी पोलिसांना देणे बंधनकारक आहे.

याबाबत पुणे पोलिसांकडून यापूर्वी घरमालक आणि पीजी चालकांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही भाडेकरूंची माहिती न देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष शाखेने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत स्थानिक पोलिस ठाण्यांची पथकेही सहभागी झाली आहेत.

शहरात वास्तव्यास असलेल्या भाडेकरू आणि पीजीमधील रहिवाशांची माहिती संकलित करून कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात येत आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलिस आयुक्त संजय दराडे आणि विशेष शाखेचे उपायुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande