
पुणे, 10 ऑगस्ट (हिं.स.)।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुरू असलेल्या प्राध्यापक भरतीसाठी तब्बल एक कोटी रुपयांचा ‘रेट’ सुरू असल्याची माहिती मिळाल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. तसेच खासगी महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरतीसाठी ५० ते ६० लाख रुपयांची मागणी केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पवार यांनी केली.
पेपरफुटीच्या प्रश्नावर प्राध्यापक, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधण्यासाठी आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. प्राध्यापक भरती प्रक्रियेत उमेदवारांच्या एपीआय/एटीआर गुणांकनातही गैरप्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पात्रतेच्या निकषांनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जात असले, तरी प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी गुण देताना भेदभाव केला जात असल्याचा दावा पवार यांनी केला. चांगले एटीआर गुणांकन असलेल्या उमेदवारांना मुलाखतीत कमी गुण, तर एटीआरमध्ये तुलनेने कमी कामगिरी असलेल्या उमेदवारांना अधिक गुण दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
विद्यापीठ प्रशासनाच्या विचारसरणीशी किंवा सत्ताधारी राजकीय व्यवस्थेशी जवळीक असलेल्या उमेदवारांना मुलाखतीत अधिक गुण दिले जात असल्याचाही दावा पवार यांनी केला. त्यामुळे प्राध्यापक भरती प्रक्रियेची पारदर्शकता आणि निष्पक्षतेबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राध्यापक भरतीतील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु