पुण्यातील शिंदवणे घाटात २४० ग्रामदूतांचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम
श्रमदानातून ५० हजार चौ.फुटांवर जलसंधारण पुणे, 10 ऑगस्ट (हिं.स.)। निसर्ग संवर्धनाचा संदेश केवळ शब्दांत न देता प्रत्यक्ष कृतीतून देत महाराष्ट्रभरातील सुमारे २४० ग्रामदूतांनी शिंदवणे घाट परिसरात पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबविला. ‘मायभू सेवा य
gfd


श्रमदानातून ५० हजार चौ.फुटांवर जलसंधारण

पुणे, 10 ऑगस्ट (हिं.स.)। निसर्ग संवर्धनाचा संदेश केवळ शब्दांत न देता प्रत्यक्ष कृतीतून देत महाराष्ट्रभरातील सुमारे २४० ग्रामदूतांनी शिंदवणे घाट परिसरात पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबविला. ‘मायभू सेवा यात्रा २०२६’ अंतर्गत आयोजित तीन दिवसीय उपक्रमातून ग्रामदूतांनी पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला.

शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान, कराड आणि ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन, उरुळी कांचन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मायभू सेवा यात्रा २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत राज्यातील विविध भागांतून आलेल्या सुमारे २४० ग्रामदूतांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यात्रेदरम्यान शिंदवणे घाट परिसरातील ऑक्सिजन पार्कमध्ये ग्रामदूतांनी श्रमदान केले. सुमारे ५० हजार चौरस फूट क्षेत्रावर जलसंधारणासाठी सलग समतल चर खोदण्यात आले. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, मृदासंवर्धन करणे तसेच परिसरातील जलसाठा वाढविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक श्रमदानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष काम उभे करून ग्रामदूतांनी ‘निसर्ग संवर्धन ही केवळ जबाबदारी नसून सामूहिक चळवळ आहे’, असा संदेश दिला. या उपक्रमामुळे शिंदवणे घाट परिसरातील जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना बळ मिळाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande