
सोलापूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)।एल निनोच्या पार्श्वभूमीवर यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा हवामान विभागाचा अंदाज होता. त्यानुसार सरकार आणि प्रशासनाने पाणी व वीज नियोजन केले. मात्र, जुलैमध्ये पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने अवघ्या पंधरा दिवसांत उजनी धरण भरल्याने हवामानाचा अंदाज चुकल्याची परिस्थिती निर्माण झाली. या बदललेल्या परिस्थितीचा फटका उन्हाळ्यात पाणी आणि विजेअभावी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना बसला.
उजनी धरणातील जलसाठा उणे २८ टक्क्यांवर गेल्यानंतर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे भीमा नदीतून शेतीसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच १४ जूनपासून शेतीसाठीचा वीजपुरवठा आठ तासांवरून दोन तासांवर आणण्यात आला होता.
मात्र, जुलैमध्ये पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. त्यामुळे अवघ्या पंधरा दिवसांत धरण भरले. धरण भरल्यानंतर सुमारे महिनाभर भीमा नदीत एक हजार ते एक लाख १० हजार क्युसेकपर्यंत विसर्ग करावा लागला.
धरण अचानक भरल्याने बॅकवॉटर परिसरातील शेती पाण्याखाली गेली. त्यानंतर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने नदीकाठच्या शेतीतील पिकांनाही फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, काही शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर पालकमंत्री गोरे यांच्यावरही टीका केली.
दरम्यान, सरकार आणि प्रशासनाने केलेले पाणी व वीज नियोजन हे हवामान विभागाच्या दुष्काळाच्या अंदाजावर आधारित होते, असे आता स्पष्ट होत आहे. सुरुवातीला पाणीटंचाईच्या शक्यतेमुळे निर्बंध लागू करण्यात आले; मात्र त्यानंतर अल्पावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली. त्यामुळे हवामान अंदाज, धरणातील पाणीसाठा आणि प्रत्यक्ष पावसाची स्थिती यांचा समन्वय साधून भविष्यात अधिक लवचिक पाणी व वीज नियोजन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड