रत्नागिरी : निवडणूक काळातील वाहन भाड्यासाठी चालक-मालक आक्रमक
रत्नागिरी, 10 ऑगस्ट (हिं.स.) । जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनाला भाडेतत्त्वावर वाहने उपलब्ध करून देणाऱ्या दापोली तालुक्यातील वाहनचालक-मालकांचे गेल्या सहा महिन्यांपासून भाडे थकीत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही दे
रत्नागिरी : निवडणूक काळातील वाहन भाड्यासाठी चालक-मालक आक्रमक


रत्नागिरी, 10 ऑगस्ट (हिं.स.) । जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनाला भाडेतत्त्वावर वाहने उपलब्ध करून देणाऱ्या दापोली तालुक्यातील वाहनचालक-मालकांचे गेल्या सहा महिन्यांपासून भाडे थकीत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही देयके मिळत नसल्याने वाहनचालक-मालक आक्रमक झाले असून, त्यांनी दापोली तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर केले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामासाठी तालुक्यातील अनेक वाहनमालकांनी ५ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आपली वाहने प्रशासनाच्या सेवेत उपलब्ध करून दिली होती. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन सहा महिने उलटले असतानाही संबंधित वाहनांचे भाडे अद्याप अदा करण्यात आलेले नाही.

निवडणुकीच्या कालावधीत इंधन, वाहन देखभाल तसेच अन्य खर्च भागविण्यासाठी अनेक वाहनमालकांना कर्ज किंवा उसनवारीचा आधार घ्यावा लागला. मात्र, वाहन भाड्याची रक्कम वेळेत न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह, वाहनांचे हप्ते आणि दैनंदिन खर्च भागविणेही कठीण झाले असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही देयकांचा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने वाहनचालक-मालकांमध्ये नाराजी आहे. थकीत भाड्याची रक्कम तातडीने अदा करून आर्थिक अडचणीत सापडलेल्या वाहनमालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. थकीत देयके लवकरात लवकर अदा न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वाहनचालक-मालकांनी दिला आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून अद्याप निधी प्राप्त झालेला नसल्याने संबंधित वाहनमालकांची देयके अदा करता आली नसल्याची माहिती तालुका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande