
सोलापूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)। आपला लाडका भक्त संत सावता माळी महाराज यांच्या भेटीसाठी पांडुरंगाच्या पादुकांची पालखी श्रीक्षेत्र अरणकडे रवाना झाली. फुलांनी आकर्षक सजावट केलेल्या रथामध्ये पांडुरंगाच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या. पालखीसोबत असलेल्या वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करत भक्तिमय वातावरणात अरणची वाट धरली. प्रस्थानापूर्वी विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने पांडुरंगाच्या पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर मंदिरातील विठ्ठल चरणाचे दर्शन घेऊन पालखी अरणच्या दिशेने मार्गस्थ झाली. तीन दिवस आणि दोन मुक्कामांचा प्रवास करून साक्षात विठुराया अरण येथे संत सावता माळी महाराजांच्या भेटीसाठी पोहोचणार आहेत.
दरम्यान, ११ ऑगस्ट रोजी संत सावता माळी महाराजांचा ७३१वा संजीवन समाधी सोहळा भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दहीहंडी कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संत सावता माळी महाराजांचे वंशज प्रभु महाराज वसेकर यांनी दिली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यातील विविध संतांच्या पालख्या पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. मात्र, संत सावता माळी महाराजांची पालखी आषाढी वारीत पंढरपूरला येत नाही. त्यामुळे पांडुरंगाच्या पादुकांची पालखी अरणकडे जाण्याची ही परंपरा भक्तांसाठी विशेष महत्त्वाची मानली जाते. पालखीच्या आगमनामुळे अरण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, संजीवन समाधी सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड