
यवतमाळ, 11 ऑगस्ट (हिं.स.)।
स्वातंत्र्यदिनाचा उत्साह केवळ ध्वजारोहण व प्रभातफेरीपुरता मर्यादित न ठेवता देशभक्ती, संस्कार आणि भारतीय संस्कृतीचा जागर करण्यासाठी मांडवा येथे यंदा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत मांडवा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय संस्था, दिग्रस यांच्या संयुक्त संस्थेतर्फे १५ ऑगस्ट रोजी गावपातळीवर वेशभूषा आणि कलात्मक रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांसह महिला, पुरुष आणि ग्रामस्थांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळणार असून स्पर्धेसाठी रोख बक्षिसांचे वितरण होणार आहे.वेशभूषा स्पर्धा प्रभातफेरीदरम्यान होणार आहे. कोणत्याही महापुरुषाची किंवा थोर नेत्याची वेशभूषा स्पर्धकांना करता येणार आहे. वेशभूषा साकारताना संबंधित व्यक्तिमत्त्वाची ओळख व कार्य थोडक्यात सांगणे आवश्यक राहणार आहे. वेशभूषा, सादरीकरण, संवाद, आत्मविश्वास, कल्पकता आणि विषयाची मांडणी या निकषांवर परीक्षकांकडून गुणांकन केले जाणार आहे. रांगोळी स्पर्धेतही गावातील कोणत्याही वयोगटातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. प्रभातफेरीच्या मार्गावरच रांगोळी साकारावी लागणार असून संबंधित ठिकाणी स्पर्धकाने आपले नाव नमूद करणे आवश्यक आहे. रांगोळी स्पर्धेतील बक्षिसांचे वितरण ध्वजारोहणानंतर लगेच करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या माध्यमातून नव्या पिढीला महापुरुषांच्या विचारांची ओळख व्हावी, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि गावात देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थी, महिला, पुरुष व सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
------------------------------------------------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी