पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
भरधाव कार आयशर ट्रकला धडकली; दोघे गंभीर जखमी सातारा, 11 ऑगस्ट (हिं.स.) : पुणे-सातारा महामार्गावरील शिरवळजवळ सोमवारी मध्यरात्रीनंतर भीषण अपघात झाला. भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार डिव्हायडरला धडकून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेली आणि समोरू
पुणे-सातारा मार्गावरील अपघातात चेंदामेंदा झालेली कार


भरधाव कार आयशर ट्रकला धडकली; दोघे गंभीर जखमी

सातारा, 11 ऑगस्ट (हिं.स.) : पुणे-सातारा महामार्गावरील शिरवळजवळ सोमवारी मध्यरात्रीनंतर भीषण अपघात झाला. भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार डिव्हायडरला धडकून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेली आणि समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला धडकली. या भीषण अपघातात तळेगाव दाभाडे आणि मावळ परिसरातील 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये वेदांत वारिंगे, सोनलिंग ठाकूर, आदित्य गरूड आणि निखिल राऊत यांचा समावेश आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार, हे तरुण पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने कारने जात होते. शिरवळ येथील हॉटेल शिवालयसमोर रात्री सुमारे 1 वाजेच्या सुमारास कारवरील चालकाचा ताबा सुटला. कार प्रथम डिव्हायडरला धडकली. त्यानंतर डिव्हायडर ओलांडून ती विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेली आणि समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला जोरदार धडकली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी दरवाजे कापावे लागले. अपघातानंतर झालेला मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अपघाताच्या नेमक्या कारणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande