
मविप्र रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण यशस्वी
नाशिक, 11 ऑगस्ट (हिं.स.)। आडगाव येथील मविप्र संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या मविप्र रुग्णालयातील अद्ययावत किडनी ट्रान्सप्लांट युनिटमध्ये दोन रुग्णांवर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती अॅड. नितीन ठाकरे व अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांनी दिली.
या शस्त्रक्रियांमध्ये एका ६२ महिलेने २२ वर्षीय नातवाला किडनीदान केले, तर दुसर्या एका तरुण रुग्णावरही अत्यंत बिकट परिस्थितीत यशस्वी उपचार करण्यात आले. मविप्र रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभाग निष्णात व तज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित झाला आहे. यापूर्वी झालेल्या दोन यशस्वी शस्त्रक्रियांनंतर नव्याने पार पडलेल्या या दोन्ही जटिल शस्त्रक्रियांमधील रुग्णांची प्रकृती पूर्णपणे सुधारली असून, त्यांना नुकताच सुरक्षितपणे डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सर्जरी विभाग प्रमुख डॉ. कैलास मोगल, मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र कोडीलकर, उपवैद्यकीय अधीक्षक मंगेश जाधव तसेच अवयवदान समन्वयक डॉ. संजय रकिबे यांच्या समन्वयातून नेफ्रॉलॉजी, सर्जरी आणि भूलशास्त्र या तिन्ही विभागांनी एकत्र येत या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. मविप्र रुग्णालयात आता अद्ययावत किडनी प्रत्यारोपण सुविधा पूर्ण क्षमतेने उपलब्ध झाली आहे. निष्णात आणि अनुभवी डॉक्टरांची टीम, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, विशेष आयसीयू आणि समर्पित सपोर्टिंग स्टाफ कार्यरत आहे. मविप्र रुग्णालयाच्या आणि संपूर्ण संस्थेच्या दृष्टीने ही ऐतिहासिक कामगिरी आहे.
- अॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI