
यवतमाळ, 11 ऑगस्ट (हिं.स.)। आगामी उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच आवश्यक परवानग्या घेऊनच उत्सव साजरा करावा, मिरवणुका डीजेमुक्त ठेवाव्यात, डीजेचा दणदणाट टाळून भक्तिमय वातावरणात मिरवणुका काढाव्यात, असे आवाहन ठाणेदार अनिल बेहरानी यांनी केले. आगामी सार्वजनिक गणेशोत्सव, दुर्गादेवी, ईद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेर पोलिस ठाण्याच्या वतीने गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक बन्सी पटेल सभागृहात घेण्यात आली. त्यामध्ये मार्गदर्शन करताना बेहरानी बोलत होते. प्रत्येक गणेश मंडळाने गणेशमूर्ती स्थापनेपूर्वी ऑनलाइन परवानगी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गणेशमूर्ती रस्त्यावर स्थापित करू नये, मोठी वाहने सुरक्षितपणे जातील अशा पद्धतीने मंडळांनी देखावे उभारावे आणि विद्युत रोषणाई करावी. शांतता समितीची बैठक असतानाही महावितरण, तहसील प्रशासन आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची अनुपस्थिती होती. उत्सवाच्या काळात वीज व्यवस्था, परवानग्या, वाहतूक आणि इतर प्रशासकीय बाबीसाठी संबंधित विभागांची भूमिका महत्त्वाची असताना अधिकारी उपस्थित नसल्याबद्दल या बैठकीला काही उपस्थितांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
मूर्ती स्थापनेसाठी जागा मालकाची परवानगी, नगर परिषदेची परवानगी व ना-हरकत प्रमाणपत्र तसेच विद्युत विभागाची आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. रोडवर बांधकामाचे साहित्य ठेवू नये, पालिका प्रशासनाने ते गणेश मिरवणुकीपुर्वीच हटवावे अशा सूचना मांडण्यात आल्या.या सर्व सूचना संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आम्ही कळवू असे ठाणेदार बेहरानी यांनी सांगितले. याप्रसंगी पोलिस उपनिरीक्षक दामोदर वाघमारे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली गुल्हाने, शिक्षण सभापती अॅड. सुनीता चव्हाणआदी उपस्थित होते.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी